Sat, Aug 17, 2019 16:47होमपेज › Marathwada › एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद

एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:44AMहिंगोली : प्रतिनिधी

एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम तयार करून  फसवणूक करणार्‍या टोळीचा हिंगोली शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

एटीएमद्वारे गंडा घालणार्‍या 4 आरोपींना चंद्रपूर येथून हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींना 9 मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मोबाइलवर कॉल करून मोठ्या शिताफीने एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम बनवून गंडा घालणार्‍या टोळीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

9 मार्च रोजी आरोपींना हिंगोली येथील न्यायालयासमोर हजर केले असता 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. विशाल तुळशीराम उमरे (34), किशन लालचंद यादाव रा.विनोदनगर दिल्ली, जितेंद्रकुमार अनिलकुमार सिंग रा.बिहार, हरिदास बिच्छाव यांना पोलिसांनी पकडले.

याप्रकरणी पुढील  तपास सुरू असल्याची माहिती पोनि मैराळ यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदणे, पोनि अशोक मैराळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ज्ञानोबा मूलगीर, पीएसआय गुहाडे, दंडगे आदींनी कारवाई केली.

3 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक 

हिंगोली येथे काही महिन्यांपूर्वी एटीएमची माहिती विचारून संबंधितांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये 3 लाख 77 हजार रुपयांची  फसवणूक झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या टोळींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमले. यातील एका आरोपीस यापूर्वीच अटक केल्याची माहिती पोनि अशोक मैराळ यांनी दिली. तसेच उर्वरित चार आरोपींना 8 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले.