Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Marathwada › ‘त्या’ मुलावर 20 तासांनंतर अंत्यसंस्कार

‘त्या’ मुलावर 20 तासांनंतर अंत्यसंस्कार

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:11PMहिंगोली : प्रतिनिधी

भूमिगत गटार योजनेच्या खड्ड्यात पडून तेरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली होती. या मृत्यूस पालिकेसह ठेकेदार जबाबदार असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृत मुलावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे तब्बल 20 तासांनंतर शहर पोलिस ठाण्यात मृत मुलाच्या मृत्यूस जबाबदार धरून ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृत मुलावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंगोली शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. मंगळवारीखडकपुरा भागातील शेख इब्राहिम शेख खिजर हा बालक भूमिगत गटार योजनेच्या खड्ड्यात हातपायधुण्यासाठी खाली उतरत असताना त्याचा तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत, ठेकेदारासह पालिकेच्या मुख्याधिकार्‍याविरोधात बालकाच्या मृत्यूस जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांसह जमावाने घेतल्यामुळे मंगळवारी रात्री 1 वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. पुन्हा बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून जमाव शहर पोलिस ठाण्यात एकत्र आल्यानंतर खबरदारी म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकसचिन गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुलदने, पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्याशी चर्चा करून जमावाने पालिका मुख्याधिकार्‍यासह संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. चर्चाअंती पालिकेने भूमिगत गटार योजनेसंदर्भात केलेल्या करारानुसार जिवीत व वित्तहानीसपालिका जबाबदार नसल्याचे दाखविल्यानंतर जमावाने दोन पाऊले मागे घेत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास शेख मोहंमद खिजर अब्दूल रशिद यांच्या तक्रारीवरून मे अ‍ॅक्‍वोटेक सोल्यूशन प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक सुहास सुधाकर जोशी यांच्या विरोधातगुन्हा दाखल केल्यानंतर जमाव शांत झाला व मृत मुलावर दुपारी 3 च्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.