Wed, Jul 17, 2019 10:36होमपेज › Marathwada › निधी खर्चाची कार्यालयांत लगीनघाई 

निधी खर्चाची कार्यालयांत लगीनघाई 

Published On: Mar 25 2018 1:25AM | Last Updated: Mar 25 2018 1:25AMबीड : प्रतिनिधी

मार्च एन्ड जस-जसा जवळ येऊ लागलाय, तस-तसे निधी खर्चाची धडपड विविध शासकीय कार्यालयात सुरू आहे. खर्चासाठी वारंवार सूचना देऊनही सुस्तावलेले प्रशासन आता लगीनघाई करीत सायंकाळी उशीरापर्यंत कामकाज करीत आहेत.  यावर्षीही नियोजन मंडळाचा सर्व निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही विभागाने आणखी निधीची मागणी केली असली तरी कृषी विभागाने मात्र एक कोटी 80 लाख रुपये परत केले आहेत.

जिल्ह्याचा पायाभूत सुविधेपासून विकास करण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळास निधी दिला जातो. या नियोजन मंडळाकडून विविध विभागांना आवश्यक त्या प्रमाणात निधी दिला जातो. या निधीतून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासह विविध योजना, विकासकामे, बांधकाम, अनुदान आदींचे कामे केली जातात. यावर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून 223 कोटी रुपयांचे नियोजन केले होते. गतवर्षीही पूर्ण निधी खर्च करण्यात आला होता. यंदाही पूर्ण निधी खर्च होईल, असा विश्‍वास नियोजन मंडळाने वर्तविला आहे. 

विविध शासकीय विभागांना कित्तेक दिवस अगोदर शासनाने निधी दिला होता. या निधीतून वेळीच योग्य ती कामे करण्याच्या सूचना पालकमंत्री, नियोजन मंडळाचे सदस्य व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्या होत्या. असे असले तरी काही कार्यालयांनी आतापर्यंत निधी खर्च करण्यास आखडता हात घेतला होता. या निधीतून विविध योजनांना अनुदानही दिले जाते. हे अनुदानही आतापर्यंत देण्यात आले नाही. निधी असा का खर्च केला जात नाही, तो का अडवून ठेवला जातो, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. 

मार्च महिना संपण्याअगोदर हा निधी खर्च करावा लागतो. मार्च महिना लोटल्यास यातील बहुतांश निधी लॅप्स होतो. त्यामुळे आता विविध कार्यालयात हा निधी खर्च करण्यासाठी अधिकार्‍यांची लगबग सुरू आहे. विशेषत: बांधकाम विभागाचे कार्यालयात आता सायंकाळी उशीरापर्यंत कामकाज सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती इतर काही कार्यालयाची आहेे.

Tags : Marathwada, Marathwada News, The fund aising campaign, ongoing, various, government offices