Fri, Jul 19, 2019 01:15होमपेज › Marathwada › पहिल्याच पावसाने बंधार्‍यांमध्ये साठले पाणी

पहिल्याच पावसाने बंधार्‍यांमध्ये साठले पाणी

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 12:21AMआष्टी : सचिन रानडे 

सततचा दुष्काळ, हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण या चक्रव्युहात अडकलेल्या आष्टी तालुक्याला यावर्षी एक आशेचा किरण दिसला आणि तो किरण आता या पावसाळ्यात बळीराजाच्या जीवनात निश्‍चित प्रकाश आणल्याशिवाय राहणार नसल्याचे चित्र असून याची सुरुवात शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाच्या सरींनी दाखवून दिले आहे.

पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गावोगाव गेली 45 दिवस असलेली स्पर्धा संपली, हजारो हातांनी श्रमदान केले, दिवसरात्र जेसीबी, पोकलॅन मशीन चालल्या आणि तालुक्यात हजारो लिटर पाणी साठवण्याची क्षमता तयार झाली. 25 जेसीबी आणि 13 पोकलॅन च्या साहाय्याने गावोगाव शेततळे, शेततलाव,नदी खोलीकरणाची कामे झाली. तब्बल दीड महिना घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी 24 लाख 13 हजार 843 घनमीटर काम केले. यातून तब्बल 25 हजार कोटी 10 लाख 34 हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून शुक्रवारी झालेल्या पहिल्याच पावसाने पाणी साठण्यास सुरुवात झाल्याने मेहनत रंग लाई अशीच भावना हे श्रमदानकर्ते बोलून दाखवीत आहेत.

तालुक्याचे काम मराठवाड्यात नंबर एक
भारतीय जैन संघटनेने सुरुवातीपासूनच आष्टी तालुक्यात या कामी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका दाखविली आणि विशेष म्हणजे अहोरात्र विनाअट देण्यात आलेल्या जेसीबी आणि पोकलॅन मशीन चालविण्याची परवानगी दिल्याने अनेकांची शेततळ्यांची स्वप्ने अर्ध्या खर्चात पूर्ण झाल्याने अनेकांनी या संघटनेचे सर्वेसर्वा शांतीलाल जैन यांचे विशेष आभार मानले.

मेहनत रंग लाई 
तालुक्यातील नागरिकांनी वॉटर कप स्पर्धेत जे योगदान दिले याचे फलित म्हणून शुक्रवारच्या पावसाने पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. करंजी, कासेवाडी या भागात झालेल्या पावसाने साठवणुकीस सुरुवात झाल्याने तालुकावासीयांची मेहनत आता सत्यात उतरत असून मेहनत रंग ला रही है अशी भावना तहसीलदार रामेश्‍वर गोरे यांनी व्यक्त केली.