Thu, Nov 15, 2018 03:26



होमपेज › Marathwada › बाप बाप होता है, बेटा बेटा होता है 

बाप बाप होता है, बेटा बेटा होता है 

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:34PM



बीड : प्रतिनिधी

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.  विजयी झाल्यानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी बाप बाप होता है, बेटा बेटा होता है, असे विधान करत धनंजय यांना टोला लगावला.

या निवडणुकीत मला घड्याळ असलेल्या अनेक हातांनी मदत केली. राष्ट्रवादीने मतांसाठी अनेक नगरसेवकांना स्मार्ट वॉच, किचेन, आयफोन वाटले होते. तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे हा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. निवडणुकीत 1005 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपकडे तब्बल 100 मते कमी होती, मात्र तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली.

त्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली होती. याशिवाय, एका मतदाराने नोटासाठी मतदान केले, दरम्यान बाद करण्यात आलेल्या मतांच्या मुद्यावरून सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्यात मतमोजणीच्या ठिकाणीच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अशोक जगदाळे यांनी फेरमतदानाची मागणी केली होती.