हिंगोली : प्रतिनिधी
मागील आठ वर्षांपासून रात्रंदिवस शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांसाठी आधार बनलेले औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा येथील शिक्षक उत्तम वानखेडे यांची बदली झाल्यानंतर ते शुक्रवारी गढाळा गावात आले असता, ग्रामस्थांनी शाळेत एकत्र येत गुरुजींना बदली रद्द करण्याची विनवणी करत होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थही रडविलेल्या चेहर्याने गुरुजींना विनवणी करत तुम्हीच आमच्या लेकराचे मायबाप आहात, शाळा सोडून जाऊ नका अशी भावनिक साद घातली.
गढाळा येथील शिक्षक उत्तम वानखेडे हे मागील आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी गढाळा येथील विद्यार्थ्यांसाठी शाळेत मुक्काम टाकून रात्री अपरात्री शिकविण्या घेतल्या. तसेच शाळेचा विकास केला. त्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थांची नाळ वानखेडे गुरुजी यांच्यासोबत जोडल्या गेली. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षकांच्या बदल्यामध्ये उत्तम वानखेडे यांची लाख येथे बदली झाल्याने चिमुकल्यासह ग्रामस्थांचा हिरमोड झाला. अनेकांनी बदली रद्द करण्याची मागणी करीत गुरुजींना गढाळ्यातच ज्ञानार्जन करण्याची विनंती केली.
उत्तम वानखेडे हे गुरुवारी शाळेत गेले असता, ग्रामस्थांनी शाळेत एकच गर्दी केली. काहीही करा परंतु बदली रद्द करा, तुम्हीच आमच्या लेकराचे मायबाप आहात अशी विनवणी करीत महिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून धायमोकून रडल्या. तसेच ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याची भेट घेऊन विद्यार्थ्यांना लळा लावणार्या वानखेडे गुरुजींची बदली रद्द करण्याची आग्रही मागणी केली.