Tue, Jul 16, 2019 02:04होमपेज › Marathwada › दोन शाळकरी मुलांसह शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

दोन शाळकरी मुलांसह शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

Published On: Aug 01 2018 8:25PM | Last Updated: Aug 01 2018 9:21PMआखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : प्रतिनिधी

कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवारात दोन शाळकरी मुलांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पन्‍नास वर्षीय शेतकर्‍याचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. आज, बुधवारी (दि.१) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे कवडी गावावर शोककळा पसरली. 

कळमनुरी तालुक्यातील कवडी येथील सुखदेव सुभाष राऊत (वय 15 इयत्‍ता सातवी), संभाजी प्रकाश पतंगे (वय 14, इयत्‍ता सहावी) व विशाल बनसोडे (वय 15,इयत्‍ता सातवी) हे तीनही विद्यार्थी शेवाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. नेहमीप्रमाणे दुपारी शाळा सुटल्यानंतर हे तिघे गावाकडे जात असताना कवडी शिवारातील गावानजीक असलेल्या गायरान जमिनीमधील मुरूमासाठी खोदकाम केलेल्या खदानीत पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. 

यातील विशाल बनसोडे याने आरडा ओरड केल्यानंतर शेजारी गुरे चारणारे शेतकरी दत्‍तराव नामदेव पतंगे (वय 50) यांनी तत्काळ खदानीकडे धाव घेत मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. विशालला खदानीबाहेर काढून  इतर दोघांना वाचविण्यासाठी खदानीत उडी घेतली. मात्र दोन्ही मुलांनी दत्‍तराव यांना पकडल्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याचवेळी शिक्षक पतंगे यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यास यांची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तिघांनाही खदानी बाहेर काढून बाळापूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी या तिघांस मृत घोषित केले.  या दुर्देवी घटनेमुळे कवडी गावावर शोककळा पसरली.