Thu, Mar 21, 2019 15:53होमपेज › Marathwada › पीककर्ज वाटपाची बोंब कायम

पीककर्ज वाटपाची बोंब कायम

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 9:56PMहिंगोली : प्रतिनिधी

कर्जमाफीची किचकट प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने नवे कर्ज भेटण्यास बँकाकडून टाळाटाळ केली जात आहे. निर्धारित 1 हजार कोटीच्या उद्दिष्टापैकी केवळ 21 कोटींचे पीककर्ज आतापर्यत वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर ठेपला असतानाही पीककर्ज मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांना खासगी सावकाराच्या दारावर जाण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करून वर्ष उलटत आले, तरी अद्यापही कर्जमाफीची रक्‍कम बँक खात्यावर जमा होऊन नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकरी पात्र झालेले नाहीत. प्रशासनाने 64 हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर 226 कोटी रुपये वर्ग केल्याचा दावा केला असला तरी अद्यापही शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली नसल्यामुळे नवे पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहे. मागील सहा महिन्यांपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्याला बँकासमोर लागल्या नाहीत. त्यातच राज्य शासनाकडून दररोज नवनवीन आदेश धडकत आहेत. कर्जमाफीच्या अर्जासाठी मुदतवाढ देऊन राज्य शासन चालढकल करीत असल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून होत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँकांकडून कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना नवे पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. एकूणच कर्जमाफी प्रक्रिया व नव्यापीक कर्जाबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम कायम आहे. 

मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतशिवारात मशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. मशागतीच्या कामाबरोबरच बाजारात बियाणे व खत खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड उडत आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून दाखल होऊन पाऊस झाल्यास पुढील आठवड्यात प्रत्यक्ष पेरणीस सुरुवात होणार असली तरी अद्यापही बँकाकडून कर्ज देण्याबाबत नकारघंटा कायम असल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली आहे. कर्जमाफीचा पत्ता नसताना जिल्हा प्रशासन मात्र 226 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा करीत आहे, परंतु याबाबत अद्यापही बँकांकडून ठोस काही सांगितले जात नसल्यामुळे शेतकर्‍यांची अडचण झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे अग्रणी बँकेकडूनही गोपनियतेच्या नावाखाली निश्‍चित आकडेवारी दिली जात नसल्यामुळे कर्जमाफी व पीक कर्जाच्या विषयावरून शेतकरी कायम संभ्रमात राहिले आहेत. 

एकीकडे कर्जमाफीचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र नव्याने कर्ज वाटप केले जात नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा खासगी सावकारांच्या दारात जाण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. प्रशासनाने यावर्षी तब्बल 1 हजार कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत केवळ 21 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ते सरासरीच्या दोन टक्के असल्यामुळे 100 टक्के पीककर्ज कधी वाटप होणार असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. शेतकर्‍यांकडून कर्जमाफीच्या आशेमुळे पीकपाण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी पदरात पीककर्ज पडत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. मागील महिनाभरापासून  बँकामध्ये चकरा मारून शेतकरी वैतागले आहेत. पीककर्जाचा संचिका तयार करूनही त्यावर निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे.