Wed, Aug 21, 2019 15:24होमपेज › Marathwada › हळद काढणीचा एकरी खर्च ९ हजारांच्या घरात

हळद काढणीचा एकरी खर्च ९ हजारांच्या घरात

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:34PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात 50 हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या हळदीच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असला तरी, बाजारात हळदीला समाधानकारक दर मिळत नसून, यासाठी येणारा खर्चही वाढल्याने हळद उत्पादकांचे कंबरडे मोडले असून शेतातून हळद बाहेर काढण्यासाठी एकरी तब्बल 9 हजारांचा खर्च येत असल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कपाशीवर येणार्‍या कीड व रोगामुळे जिल्हाभरातील शेतकरी हळद पिकाकडे वळले आहेत. यावर्षी जिल्ह्यात जवळपास 50 हजार हेक्टरवर हळदीची लागवड केली आहे. बाजारात हळदीला सरासरी 7 ते 8 हजार रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळत असल्याने हळद लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असला तरी यावर्षी मात्र हळद काढणीबरोबर इतर प्रक्रियेसाठी येणारा खर्च वाढल्याने हळद उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. 

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्हाभरात हळदीची काढणी सुरू झाली आहे. ट्रॅक्टरद्वारे किंवा नागराद्वारे हळद काढल्यानंतर ती हळद मोडून ढिग घालण्यासाठी मजुरांकडून एकरी 9 हजाराची मजुरी मागितली जात आहे. एरव्ही हे काम रोजंदारीवर चालत असे; परंतु ग्रामीण भागात मजुरीने काम करणार्‍यांची संख्या घडली आहे. अनेक मजूर कामासाठी पुणे, मुंबई तसेच ऊस तोडीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्याने मजुरांची मागणी वाढली आहे.

मागणी वाढल्याचा परिणाम मजुरीवर झाला असून, हळदीच्या काढणीसाठी एकरी 9 हजार रुपये मोजावे लागत असल्याने हळद उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. हळद मोडीबरोबरच हळदीला शिजवून किमान एक महिना कडक उन्हात वाळविल्यानंतर ती विक्रीसाठी तयार होते. किमान एक महिना चालणार्‍या या प्रक्रियेला मोठा खर्च येत असल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

माझ्याकडे दीड एकर हळद असून हळद काढणीसाठी मी चौदा हजारांचा सौदा मजुरांशी केला आहे. गावात मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे शेजारील गावातील मजरांना माझे हळदीचे पीक काढणीसाठी गुत्ते दिले आहे. हळदीला 7 ते साडेसात हजार रुपये दर मिळत असल्याने तो परवडणारा नाही. किमान दहा हजार रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाल्यास हळद उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील हळद उत्पादक शेतकरी सुंदर चव्हाण यांनी सांगितले.