Wed, May 22, 2019 06:54होमपेज › Marathwada › कुंडलिका धरणाच्या काठी मृत माशांचा खच 

कुंडलिका धरणाच्या काठी मृत माशांचा खच 

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 29 2018 11:41PMवडवणी  : प्रतिनिधी

तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणातील मासे मृत  झाले आहेत. मोठ मोठे  मासे मृत  होऊन पाण्यावर  तरंगत  काठावर आले आहेत. एवढ्या  मोठ्या  प्रमाणावर  मासे मृत झाल्याने एकच खळबळ  उडाली आहे. वडवणी आणि धारूर तालुक्याच्या सीमेवर वडवणी तालुक्यातील उपळी शिवारात भिंत असणारा  कुंडलिका  प्रकल्प पाच ते सहा गावांच्या शिवारात विस्तारलेला आहे. मागील महिनाभरात झालेल्या  पावसामुळे  काही प्रमाणात  पाण्याची पातळी  वाढलेली  आहे. या धरणातील मासे मोठ्या  प्रमाणात मृत पावले आहेत.  शुक्रवारी  सकाळी  येथील  नागरिकांना धरणाच्या भिंतीजवळून जाताना धरणाच्या पाणीसाठ्यात मृत झालेले मासे तरंगत असल्याचे दिसले. माहिती  गावात समजताच नागरिकांनी  एकच गर्दी केली.  मृत पावलेल्या माशांचा खच निर्माण झाला आहे. काही मासे छोटे छोटे आहेत तर काही मासे तीन ते पाच किलो वजनाचे आहेत. मोठ्या संख्येने  मासे मृत  पावले आहेत. 

दुर्गंधी आणि दूषित पाणी 

उपळी येथील  कुंडलिका धरणात मोठ्या  प्रमाणावर मासे मृत  झाल्याने धरणातील पाणी दूषित  झाले आहे.  पाण्यावर  मासे तरंगत असल्याने सडलेल्या माशांमुळे  पाण्याला  दुर्गंधी  निर्माण झाली आहे. 

अनेक गावांना पिण्यासाठी  पाणी 

वडवणी तालुक्यासह धारूर तालुक्यातील अनेक  गावांना या धरणातून पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात  येतो. धरणातील पाणी  दूषित  झाल्याने पाणीपुरवठा  करण्यात  येणार्‍या  गावातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण  झाला आहे. 

कोणीही  फिरकले नाही

वडवणी आणि  धारूर तालुक्यातील अनेक  गावांना  पाणीपुरवठा  करणार्‍या या धरणात एवढा  गंभीर  प्रकार घडला  असतानाही   अधिकार्‍यांनी या धरणावर जाऊन पाहणी  केली  नाही.