Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Marathwada › महामंडळाची बस सहा फूट खड्ड्यात 

महामंडळाची बस सहा फूट खड्ड्यात 

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:40PMगेवराई : प्रतिनिधी

वेळ सकाळी 7 ची...बीडहून कोपरगावकडे 28 प्रवासी घेऊन भरधाव वेगाने एसटी बस निघाली होती. गेवराईजवळ अचानक बस चालकाला फिट आली अन क्षणार्धात  चालकाचा बसवरील ताबा सुटतो. बस रस्त्याच्या कडेला सहा फूट खदानीत जाऊन दगडी कंपाउंड भिंतीला जाऊन जोरात धडकते... प्रवासी भीतीने घट्टमुठी आवळून डोळे मिटून घेतात. यात चालक, वाहक व प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामुळे प्रवाशांना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय येतो.

ही घटना गेवराईजवळील शासकीय विश्रामगृहाच्या समोरील बाजूस असलेल्या महावितरण कार्यालयजवळ मंगळवारी दि.12 रोजी सकाळी 7 च्या दरम्यान घडली आहे. कोपरगाव आगाराची बस (एम एच 14 बी टी 3469)  बीडहून कोपरगावकडे 28 प्रवासी घेऊन निघाली होती. बस गेवराई विश्रामगृहाजवळ आली असता चालकाला अचानक फिट आल्याने वाहनावरील पूर्णपणे ताबा सुटला आणि बस महामार्गाच्या बाजुला असलेल्या सहा फूट खड्ड्यात जाऊन महावितरण कार्यालयाच्या दगडी कंपाउंडला धडकली. बसचा वेग ऐवढा होता की दगडी कंपाउंड तुटून पडले, मात्र सुदैवाने बसमधील कोणीही गंभीर जखमी झाले नाही. त्यामुळे बसमधील प्रवाशी जोरात आदळल्याने जवळपास 10 ते 12 प्रवाशांना डोक्याला व चेहर्‍याला किरकोळ मार लागला.

मोठी दुर्घटना टळली...

महत्त्वाचे म्हणजे अपघातग्रस्त बस ज्या ठिकाणी कंपाउंडला जाऊन धडकली तेथून पुढे अवघ्या 15 ते 20 फुटावर गेवराई शहर तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा करणारे मोठ मोठे रोहित्र, मेन लाईटचे पोल व वीज केंद्र होते. त्यामुळे अपघातानंतर पुनर्जन्म मिळाल्याच्या भावना प्रवासी व्यक्त करत होते. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून घेतले.