Mon, Mar 18, 2019 19:34होमपेज › Marathwada › स्वच्छ सर्वेक्षणात बीड जिल्ह्यात माजलगाव नगर परिषद अव्वल 

स्वच्छ सर्वेक्षणात बीड जिल्ह्यात माजलगाव नगर परिषद अव्वल 

Published On: Jun 23 2018 6:30PM | Last Updated: Jun 23 2018 6:30PMमाजलगाव : प्रतिनिधी

केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत राबवण्यात आलेल्या अभियानात माजलगाव नगर परिषदेने अव्वल स्थानावर बाजी मारली आहे. देशपातळीवर केलेल्या या सर्वेक्षणात माजलगाव नगर परिषदेने देशात ३२ वा, तर बीड जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. या यशामुळे नगराध्यक्षासह, पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अव्वल स्थानावर असलेल्या माजलगाव नगर पालिकेला पारितोषिक, युरोप दौरा, ५ कोटी रुपयाचे बक्षीस देवून दिल्ली येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. देशातील सर्वच पालिकेला यात सहभागी करून घेतले आहे. या अभियाना अंतर्गत स्वच्छ सुंदर असणाऱ्या नगरपालिकेचा, पंचायत समितीचे सर्वेक्षण करून क्रमांक देण्यात आले होते. देशातील २ हजार ४०० नगर पालिकेचे सर्वेक्षण करून केंद्र शासनाने नुकतीच क्रमवारी जाहीर केली आहे. या सर्वेक्षणात माजलगाव नगर पालिकेने बाजी मारली असून या अभियानात देशात ३२ वा, तर महाराष्ट्रात १९ व्या क्रमांकावर येत, बीड जिल्ह्यातून प्रथम येणाचा मान माजलगाव नगरपरिषदेने मिळवला. 

दरम्यान केंद्र शासनाने  घेतलेल्या या अभियानात नागरिकांचे प्रबोधन, उघड्यावर स्वच्छतेस न बसणे, सर्वसाधारण स्वच्छता व नागरिकांचा प्रतिसाद या चार मुद्द्यावर सर्वेक्षण करण्यात आले होते. यात सर्वच बाबतीत माजलगाव नगर पालिका सरस ठरल्याने पालिकेचे नाव देश पातळीवर झळकले आहे. या अभियानात मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सतीश शिवणे यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे.

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची स्वप्नपुर्ती 

शहराच्या स्वच्छतेबाबत माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस हे नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यावर निगराणी ठेवण्यासाठी ते पहाटेपासूनच रस्त्यावर उतरून स्वच्छता करून घेत असत. स्वच्छ सर्वेक्षणात माजलगाव नगर पालिकेच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवल्याने स्वच्छ शहरासाठी मागील अनेक वर्षापासून तत्पर असलेल्या नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची एक प्रकारे स्वप्नपूर्तीच झाली आहे.  

हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली मेंटोर सतीष शिवणे, आशिष लोकरे, माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, कमिटीचे सभापती, नागरीक, दीक्षा सिरसट, पार्वती कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश मिळाले आहे. या सर्वांचा मी आभारी आहे. - सहाल चाऊस, नगराध्यक्ष नगर परिषद माजलगाव