Sun, May 26, 2019 13:25होमपेज › Marathwada › वांगी येथील वाळू घाट रद्द

वांगी येथील वाळू घाट रद्द

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 10:27PMमानवत : प्रतिनिधी

उत्खननाची मर्यादा ओलांडून वादग्रस्त ठरलेला मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्‍काअखेर रद्द करण्याच्या निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. अतिरिक्‍त वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदारास तब्बल दीड कोटी रुपयांच्या दंड ठोठावण्यात आला आहे.रेती लिलाव प्रक्रियेत तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्‍का बार्शी येथील श्रीराम कन्स्ट्रक्शन यांना सुटला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित ठेकेदारास 7 मार्च ते 30 सप्टेंबर या कालावधीत चार हजार चारशे सत्तरा ब्रास वाळू उपसण्याची परवानगी दिली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी 20 मार्च रोजी वांगी येथील वाळू धक्क्याला भेट दिली असता त्यांना नदीपात्रात 50 रिकामी वाहने व 3 जेसीबी मशीन आढळून आल्या होत्या. यामुळे शिंदे यांनी तत्काळ उत्खनन थाबंवून इटीएसद्वारे मोजमाप करण्याचे आदेश दिले होते. 

यानुसार मोजमाप केले असता वाळू उत्खननात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली होती. ठेकेदारास 30 सप्टेंबरपर्यंत 4417 ब्रास वाळू उपसण्याची परवानगी असताना केवळ 14 दिवसांत ठेकेदाराने तब्बल 5798 ब्रास एवढी वाळू उत्खनन केल्याचे निदर्शनास आले होते. ठेकेदाराने अवघ्या 14  दिवसांत मर्यादा ओलांडून 1381 ब्रास अधिक वाळू उत्खनन केल्याचे आढळून आले. मोजमाप करून तब्बल दोन महिन्यांचा कालावधी होत असताना कोणतीही दंडात्मक कारवाई झाली नव्हती. याबाबत संबंधित ठेकेदाराने केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने तो अमान्य करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाने रेती घाट रद्द करून मानवतच्या तहसीलदारांना लिलाव घाट ठेकेदाराकडून काढून घेण्याचा आदेश देण्यात 
आला आहे. 

सरपंचाला नोटीस  

सोनपेठ : प्रतिनिधी

तालुक्यातील खडका येथे मागील काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना 5 मे रोजी प्रत्यक्ष कारवाईनंतर लक्षात आल्यानंतर याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात सरपंचासह पोलिस पाटलास  खुलासा सादर करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकार्‍यांनी बजावली आहे. 

अवैध वाळू उपसा करून महसूल प्रशासनाची दिशाभूल माफियांनी केलेली आहे. गावातून रेती उपसा होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवत तो बंद करण्याचे काम ग्रामपंचायतीने करावे, असा  शासनाचा अध्यादेश आहे, पण असा कोणताही बंदोबस्त ग्रामपंचायतने केला नसल्याने जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणची ड्रोन कॅमेर्‍याद्वारे पाहणी केली असता खडका येथून सुमारे दोन हजार ब्रास वाळू चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून खडका हे गाव जिल्हाधिकार्‍यांच्या अजेंड्यावर होते.

त्यांनी दि. 5 मे रोजी खडका येथे गोदावरीची अचानक पाहणी केली असता हा प्रकार निदर्शनास आला. यात ग्रामपंचायतीने वाळूच्या अवैध उत्खननाची बाब निदर्शनास आल्यास तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना माहिती देणे आवश्यक आहे. तसेच लिलाव न झालेल्या वाळूघाटातून उत्खनन होत असल्यास या उत्खननास प्रतिबंध करून त्याचीही माहिती देण्याचे कळवले आहे. यात अद्यापपर्यत आपण कोणत्याही प्रकारची माहिती या दोन्ही कार्यालयांना दिली नाही. यामुळे ताबडतोब माहितीचा खुलासा न पाठवल्यास यामध्ये आपले संगनमत असल्याचे समजून आपणावर कारवाई  का करण्यात येऊ नये? असा उल्‍लेखही या नोटीसीत करण्यात आला आहे.