Fri, Jan 18, 2019 07:16होमपेज › Marathwada › बीड-पाथर्डी रस्त्यावर विना फलकाच्या बस 

बीड-पाथर्डी रस्त्यावर विना फलकाच्या बस 

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 10:22PMशिरूर : जालिंदर नन्नवरे 

अधिक मास व शाळेला असलेल्या सुट्यामुळे सध्या महामंडळाच्या बसगाड्या हाऊसफुल्ल चालल्या आहेत, परंतु महामंडळाच्या गलथान कारभारामुळे काही बस गाड्यावरील नामफलकच गायब झाले असल्याचे चित्र सध्या बीड-पाथर्डी रस्त्यावर पाहण्यासाठी मिळत आहे. यामुळे प्रवासी वर्गात बस गाड्याची शोधाशोध करण्यात तारांबळ उडत आहे.सध्या अनेक बसची दुरवस्था झाली आहे. अशा बसने ग्रामीण भागातील प्रवास करणार्‍या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. 

बीड आगाराच्या सेवेत असणार्‍या निम्याहून अधिक बसगाड्याची दुरवस्था झाली असून बर्‍याच बसच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, दरम्यान बसमध्ये आगारातर्फे तुटलेल्या खिडक्या बसविणे गरजेचे असताना याकडेही महामंडळाचा काना डोळा होत असल्याने प्रवाशांचा त्रास वाढला आहे.

वायफाय नको, तुटलेल्या खिडक्या बसवा

आगारामध्ये शिवनेरी, व्हाल्वोसारख्या बस सेवेत येत आहेत. असे असताना बीड आगार मात्र खटारा झालेल्या बसने ग्रामीण प्रवाशांना सेवा देत आहे. बसमध्ये प्रवास करताना वाय फाय बसवून मनोरंजन करण्यापेक्षा तुटलेल्या खिडक्या जर बसविल्या तर प्रवाशांचे हाल होणार नाही, प्रवाशांना विविध समस्या भेडसावणार नाही अशी मागणी होत आहे.


काचावर चुन्याने टाकले जाते नाव

बस आगारातील काही चालक व वाहक तंबाखू खातात. याच तंबाखुच्या चुन्याने बस कोठे चालली आहे, याचे नाव काचावर टाकण्याचे प्रकारही अनेकदा दिसून येतात. ग्रामीण भागात अनेकजण अशिक्षीत असतात, काहींची दृष्टी कमी झालेले असते, अशा परिस्थितीत चांगले फलक लावून बस आगारातून सोडण्याची मागणीही होत आहे.