होमपेज › Marathwada › नगर परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

नगर परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 03 2018 11:29PMपरळी : प्रतिनिधी

परळी नगरपरिषदेचा 2018-2019 वर्षासाठीचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सरोजिनी हालगे यांनी मांडला. प्रथमच ना दरवाढ ना करवाढ हे 2 कोटी 73 लाख 25 हजार 343 रुपये शिल्लकीच्या अर्थसंकल्पाचे प्रमुख आकर्षण असल्याचे नगराध्यक्षा सरोजिनी हालगे यांनी सांगितले. विरोधकांचा मात्र खर्चाच्या काही मुद्यांवर आक्षेप आहे. या अर्थसंकल्पात नगर पालिका दर व कर माध्यमांतून 4 कोटी 73 लाख 40 हजार रुपये महसूल मिळवेल असे नमूद केले आहे. याशिवाय विशेष अधिनियमाखाली 85 लाख रुपये वसुली, न. प. मालमत्ता उत्पन्न 6 कोटी 57 लाख रुपये, अनुदाने व अंशदान माध्यमांतून 108 कोटी 95 लाख 60 हजार रुपये, संकीर्ण उत्पन्न 78 लाख 65 हजार असे मिळून एकूण महसूल उत्पन्न 128 कोटी 26 लाख 20 हजार रुपये अपेक्षीत आहे. अपेक्षीत भांडवली उत्पन्न 4 कोटी 75 लाख आणि असाधारण संकीर्ण जमा उत्पन्न यांसह मागील वर्षीच्या शिल्लकीसह सदर उत्पन्न 157 कोटी 61 लाख 45 हजार रुपये नगर पालिकेला अपेक्षीत असल्याचे हालगे म्हणाल्या.

साफसफाई आणि आरोग्य व्यवस्थेसाठी 9 कोटी 23 लाखांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. पाणीपुरवठा सेवेवर 4 कोटी 88 लाख खर्च होईल अशी अपेक्षा आहे. रस्त्यावरील विद्युत व्यवस्थेसाठी 1 कोटी 36 लाख 80 हजार रुपये खर्चाचा अंदाज आहे. दुर्बल घटकांच्या विकासासाठी 22 लाखांची रक्कम राखीव असेल. भालचंद्र वाचनालय आणि इतर वाचनालयांसाठी 31 लाख 40 हजारांचा खर्च अपेक्षीत आहे. रस्ते, सभागृहे, नाल्या बांधकाम, सध्या प्रगतीपथावर असलेली नगर परिषदेची प्रशासकीय इमारत, नगरोत्थान रस्ते, अल्पसंख्यांक कल्याण योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून नटराज रंग मंदिर दुरुस्ती व शादीखाना व इतर कामांसाठी शासनाच्या विविध योजनांतून मिळणारी रक्कम खर्च केली जाणार असे नगराध्यक्षा हालगे यांचे म्हणणे आहे.