Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Marathwada › बिबट्याचा वासरू मारण्याचा प्रयत्न फसला; दहशत कायम

बिबट्याचा वासरू मारण्याचा प्रयत्न फसला; दहशत कायम

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:48AMलिमला : प्रतिनिधी

गोदापट्ट्यात बिबट्याने  दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत दोन वासरांचा फडशा पाडला आहे. 9 मार्च रोजी  पहाटे तीन वाजता तिसर्‍या वासराचा फडशा पाडण्याचा त्याचा प्रयत्न गाईने बांधलेली मेख उपटल्याने फसला.

शिवाजीराव दुधाटे यांच्या गाईने मेख उपटून बिबट्याला प्रतिकार केल्याने वासरू  या हल्ल्यातून बालंबाल वाचले. गाईच्या रुद्रावतारामुळे बिबट्या पसार झाला; पण हल्ल्यात वासराच्या  मानेला, मांडीवर बिबट्याचे पंजे  लागले आहेत. देवठणा देऊळगाव शिवारात आखाड्यावर बिबट्याच्या  धुमाकूळ आहे. वन विभागाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. 

माणसे फाडल्यावर प्रशासन बिबट्याचा बंदोबस्त करणार का? 

गेल्या काही दिवसांपासून पूर्णा तालुक्यातील देऊळगाव देवठणा शिवारात बिबट्याने हाहाकार माजवला आहे. एकामागून एक वासरू बिबट्या फस्त करत असताना वन विभागाचे प्रमुख अधिकारी मात्र फज्जा गाठून सर्व जवाबदारी वन मजुरांवर सोडत आहेत. माणसे फाडल्यावर बिबट्याचा बंदोबस्त करता का? असा सवाल होत आहे.   - राजेभाऊ दुधाटे, शेतकरी

बिबट्याचे नाव काढले तरी अंगावर काटा उभा राहत आहे. सर्वांना गावात जागा नसते. त्यामुळे गोठ्याचे वांदे  आहेत. शेतात आखाड्यावर नाईलाजाने जनावरांना बांधावे लागत आहे. माणूस जरा बाजूला गेला की, वासरावर हल्ला केला जात आहे. सुदैवाने गाय सतर्क असल्याने आमचे वासरू वाचले.   - शिवाजी दुधाटे, शेतकरी 

बिबट्याला पकडा हो? : बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकार्‍यांना सात दिवस लोटले तरी यश आले नाही.  तोकडी यंत्रणा तसेच मोठे अधिकारी जिल्ह्याहून कारभार हाकत आहेत. त्यामुळे बिबट्या नागरिकांना हैराण करत आहे. वास्तविक आता बिबट्याचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे.  - दिगंबर दुधाटे, शेतकरी