Fri, Apr 26, 2019 10:00होमपेज › Marathwada › एक लाख हेक्टरने कापसाचे क्षेत्र घटणार

एक लाख हेक्टरने कापसाचे क्षेत्र घटणार

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:20PMबीड : दिनेश गुळवे

गतवर्षी बोंडअळीने कापसाचा झालेला सुफडासाफ, समाधानकारक दर न मिळाल्याने कापूस शेती शेतकर्‍यांच्या मनातून उतरू लागली आहे. पांढरे सोने म्हणून वैभव असलेल्या या शेतीला आता सोयाबीन पीक पर्याय ठरू लागले आहे. गतवर्षी जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर कापूसाचे क्षेत्र होते. यावर्षी तब्बल एक लाख हेक्टरने या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. शेतकरी आता लागवडीचे तयारी करू लागल्याने बाजारात नऊ लाख कापसाच्या बॅग दाखल झाल्या आहेत. 

बीड जिल्ह्यात पेरणीयोग्य क्षेत्र सहा लाख हेक्टरवर आहेत. यातील अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. दर चांगला मिळत असल्याने पांढरे सोने म्हणून शेतकरी कापूस लागवड करीत. आता मात्र हेच पांढरे सोने शेतकर्‍यांच्या मनातून उतरू लागले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात तीन लाख 61 हजार 805 हेक्टरवर कापूस शेती होती. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने कापूस बहरात आला होता, मात्र पहिली वेचणी होती ना होती तोच कापसावर बोंड अळीने हल्ला केला. शेतकर्‍यांनी महागड्या फवारण्या करूनही उपयोग झाला नाही.

अख्खे शेतच्या शेत बोंडअळीने खाल्ले. झालेला खर्चही निघाला नाही. बोंडअळीनंतर निघालेला कापूस फरतड म्हणून विक्री झाला. सुरुवातीला निघालेल्या कापसालाही चांगला भाव मिळाला नाही. भरीस भर म्हणून नंतर वेचणीला वीस रुपये प्रतिकिलोचा दर होता. 20 रुपये किलोने वेचणी व 30 रुपयांचा दर आल्याने शेतकर्‍यांना कापूस वेचणी व साठवणूक, वाहतूक, विक्री यासही परवडला नाही. यामुळे आता कापूस म्हटले की शेतकरी नकोरे बाबा म्हणू लागले आहेत. 

याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. शेतकर्‍यांचा कापूस शेतीचा कल नसल्याने व फळबाग, उसाचे क्षेत्र वाढ झाल्याने यंदा दोन लाख 10 हजार हेक्टरच्या आसपास कापूस लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

नऊ लाख पॉकेट बाजारात

जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर कापूस लागवड होऊ शकते, असा अंदाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 13 लाख 20 हजार 222 बीटी कॉटन कापूस बॅगची मागणी करण्यात आली आहे. विविध 42 कंपन्यांच्या 370 वाणांना यावर्षी मंजुरी दिली आहे. आज घडीला जिल्ह्यात नऊ लाख बॅग दाखल झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

कृषी विभागाचा अंदाज

जिल्ह्यात अनेक शेतकरी दहा-दहा वर्षांपासून कापूस पीक घेत आहेत. याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवरही झाला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी निघत आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासह कमी खर्च व दोन पीक निघत असल्याने शेतकरी आता सोयाबीनकडे वळला आहे. यंदा जिल्ह्यातील सोयाबीनचा पेरा 50 हजार हेक्टरवर वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.