Wed, Jul 24, 2019 12:22



होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात बंदला हिंसक वळण

लातूर जिल्ह्यात बंदला हिंसक वळण

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 9:59PM

बुकमार्क करा




लातूर : प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यात निलंगा येथे महाराष्ट्र बंदला हिसंक वळण लागले. तेथे दोन गटांत झालेल्या  तूफान दगडफेकीत सात पोलिस जखमी झाले. पोलिस गाडीची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती तणावाखाली असल्याने तेथे रात्री 9 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. निलंगा वगळता जिल्ह्यात सर्वत्र बंद शांततेत पार पडला. निलंगा शहरातील दापका वेस परिसरात बंदचे आवाहन करीत एका समाजातील काही युवक आले.  त्यावेळी त्यांचा तेथील एका दुसर्‍या समाजातील गटाशी वाद झाला. त्याचे पर्यावसान तूफान दगडफेकीत झाले.

जमावांनी वाहनांचीही तोडफोड केली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती गंभीर बनत असल्याने सौम्य लाठीचार्ज करुन अश्रूधुराच्या दोन नळकांड्याही फोडल्या. यावेळी संतप्त जमावाने  पोलिसांवर दगड भिरकावले. त्यात  सात पोलिस जखमी झाले.  सपोनि प्रियांका आघाव या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ लातूरला हलवण्यात आले. अन्य जखमींत  सचिन उस्तुर्गे, सुधीर शिंदे, ए. एन. माशाळ, महादेव फुले, एन. यू. चव्हाण या पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे शिवाय काही नागरिकही जखमी झाले आहेत.

 शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. लातूर बंद कडकडीत अन् शांततेत लातुरात शिवाजी चौकनजिक रेल्वेलाईन  परिसरात अज्ञात जमावाकडून एका पानटपवरीवर तसेच एका लाँड्री दुकानावर झालेली दगडफेक वगळता बंद शांततेत व कडकडीत झाला. जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळाला. बसस्थानकातून सकाळी सोडलेल्या तीन बसेसपैकी उदगीरनजीक लोहार्‍याजवळ बसवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर सर्वच बसेसची वाहतूक थांबवण्यात आली. लातूर विभागांतर्गत सुमारे 35 ते 40 लाखांचा फटका बसल्याचे राज्य परिवहनच्या विभाग नियंत्रकांनी सांगितले. पेट्रोल पंप बंद 
झाल्याने वाहनधारकांची तारांबळ झाली. अनेक टायर जाळून वाहतुकीची कोंडी करण्यात आली होती.  लातूर शहरातील  शाळा व महाविद्यालये सुरक्षेच्या कारणावरून बंद ठेवण्यात आली होती.