Tue, Apr 23, 2019 08:07होमपेज › Marathwada › जिल्ह्याला मिळाला दहावा आमदार

जिल्ह्याला मिळाला दहावा आमदार

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:24PMबीड : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्याचा सातत्याने दबदबा राहिला आहे. त्याला कारणही तसेच आहे. कधी सत्ता तर कधी विरोधकात जिल्ह्याला मानाचे पाण मिळालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सातत्याने आमदारांची संख्याही मोठी राहिलेले आहे. चार वर्षांपूर्वी जिल्ह्याला बारा आमदार होते. कालांतराने ते कमी झाले. आता जिल्ह्याला पुन्हा दहावा आमदार सुरेश धस यांच्या रुपाने मिळालेला आहे. आमदारांची संख्या वाढल्याने विकासाचा पाटही वाहता राहण्यास मदत होत आहे. 

राज्याच्या राजकारणात बीडचा दबदबा सातत्याने असल्याचे समोर आलेले आहे. गोपीनाथ मुंडे, केशरकाकू क्षीरसागर असोत अथवा त्याही अगोदर प्रतिसरकार क्रांतीसिंह नाना पाटील असोत तेव्हापासून राजकारणात बीडचा दबदबा आहे, तो आजतागायत. राजकारणात दबदबा असल्याने जिल्ह्याला राजकीय पदांची नेहमीच वाढ भरभरून राहिलेली आहे. यामध्ये विधान परिषदेचे सदस्यत्वही अनेकांना मिळालेले आहे. चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात बारा आमदार होते. यातील काही विधान सभेचे व काही विधान परिषदेचे होते.

गत काही वर्षांमध्ये विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने जिल्ह्यातील आमदारांची संख्या घटली होती, ती आता पुन्हा वाढू लागली आहे. सध्याही जिल्ह्यात सहा विधानसभेचे व चार विधान परिषदेचे आमदार आहेत. यामध्ये विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, शिवसंग्रामचे संस्थापक विनायकराव मेटे, राष्ट्रवादीचे आ. अमरसिंह पंडित व आता सुरेश धस यांचा समावेश आहे. या अगोदरही डॉ. नारायण मुंडे, उषा दरोडे, सुरेश नवले, राम पंडागळे व एम. एम. शेख यांनाही विधान परिषदेचे सदस्यत्व होते. यातील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. विनायकराव मेटे व आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषद गाजवत आहेत. विधान परिषद सदस्यत्वाच्या माध्यमातून सर्वच सदस्यांनी जिल्ह्यात मोलाचे काम केले आहे. आता ही संधी सुरेश धस यांना मिळाल्याने त्यांच्याकडूही अपेक्षा वाढलेल्याच आहेत. 

मेटेनंतर धस मंत्रीपदाच्या शर्यतीत

बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत दोन-दोन मंत्रीपद राहिलेले आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना सुरेश नवले मंत्री होते, यानंतर जयदत्त क्षीरसागर व स्व. डॉ. विमल मुंदडा, जयदत्त क्षीरसागर व प्रकाश सोळंके, सुरेश धस यांच्या रुपाने जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे कायम दोन लाल दिवे राहिलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सातत्याने दुसर्‍या मंत्रीपदाची चर्चा होत आहे. विनायकराव मेटे गेल्या चार वर्षांपासून मंत्रीपदासाठी शर्यतीत आहेत, आता सुरेश धस यांनाही मंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यता आहे.