होमपेज › Marathwada › शिक्षकांच्या बदल्यांनी कही खुशी कही गम

शिक्षकांच्या बदल्यांनी कही खुशी कही गम

Published On: May 12 2018 1:30AM | Last Updated: May 12 2018 12:26AMबीड, अंबाजोगाई : प्रतिनिधी

गतवर्षी होऊ न शकलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना यंदा मुहूर्त मिळाला आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली झाल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 82 शिक्षक बदली होऊन आले असून 159 शिक्षक बाहेर जिल्ह्यात बदली होऊन गेले आहेत. आता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया होणार असून यामुळे काही शिक्षकांना खुशी आहे, तर काहींना गम आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांना बदल्यांसाठी मोठा अर्थपूर्ण व्यवहार केला जात असल्याचा आरोप नेहमीच होत आला आहे. तसेच जिल्हा परिषदेमधून राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षकांना बदली करण्यास सोपे जात असल्याच्याही तक्रारी होतात. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी गतवर्षीपासून ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. गतवर्षी ही प्रक्रिया राबविण्यात अडचणी आल्या, यावर्षी मात्र ही प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. 

शिक्षकांच्या बदल्यांसाठी नियमावली बनवली आहे. त्यामध्ये संवर्ग-1 मध्ये प्राधान्याने अतिदुर्धर आजार, विधवा परित्यक्ता, अपंग अशा शिक्षक, शिक्षिकांच्या बदल्या, त्यानंतर संवर्ग-2 मध्ये पती-पत्नी एकत्र, संवर्ग-3 मध्ये राहिलेले सर्व अशा तीन संवर्गांमध्ये पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागवून घेऊन छाननी करण्यात आली. गतवर्षी आंतरजिल्हा बदली झाली होती. त्यावेळी जिल्हांतर्गत बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यावर्षी मात्र मेमध्येच आंतरजिल्हा बदली करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यात 82 शिक्षक आले असून येथून 159 शिक्षक बाहेर जिल्ह्यात गेले आहेत. 

आता शिक्षकांना जिल्हांतर्गत बदल्यांचे वेध लागले आहेत. अनेक शिक्षक वर्षानुवर्षे शहरात व घराजवळच्या शाळेत ठाण मांडून बसले आहेत, तर काही शिक्षक वर्षानुवर्षे डोंगरमाध्यावरील शाळांत ज्ञानार्जनाचे काम करीत आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या ऑनलाइन बदलीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य शिक्षकांना मात्र न्याय मिळाला आहे. 

जिल्हा परिषदेतील साखळीला ब्रेक

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या असो वा ग्रामसेवक यांच्या बदली करण्यासाठी दलालांची साखळी तयार झालेली आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी तब्बल एक ते दीड लाख तर जिल्हांतर्गत बदल्यांसाठी तीस ते 50 हजार रुपयांची मागणी केली जात होती. यामुळे सामान्य शिक्षक मात्र भरडले जात होते. या प्रकारातून शिक्षकांची फसवणूक होत असे. मात्र, आता ऑनलाइन बदल्यांमुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या गैरप्रकाराला ब्रेक लागला आहे. 

शहरातील, घराजवळ शाळा असलेल्या शिक्षकांना धाकधूक

काही शिक्षक दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून शहरातील शाळांवर कार्यरत आहेत, तर, काहींनी ग्रामीण भागात घराजवळच्या शाळांवर बदली करून घेतलेले आहेत. ऑनलाईन बदली होत असल्याने जिल्ह्यात बदली कोठे होईल? तेथे जाण्याची सोय काय? अशा एक ना अनेक कारणांनी काही शिक्षकांची धाकधूक वाढली आहे.