होमपेज › Marathwada › मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या

मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 30 2018 10:53PMपरभणी : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू झालेले आहे. यास काही ठिकाणी हिंसक वळण आल्याने मराठा युवकांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीची वाट शासन  पाहत  आहे. त्या आयोगाच्या शिफारशीची कुठलीही वाट न पाहता विशेष अधिवेशन बोलवावे, अधिवेशनासाठी कुठलाही वेळ वाया घालवू नये अशी परभणी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत एकमुखी मागणी केली आहे. तसेच यावेळी मराठा तरुणांवर पोलिसांकडून दाखल सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही आ.पाटील यांनी दिली. 

आ.दुर्राणी यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून दिले पत्र

पाथरी : महाराष्ट्रात 18 जुलैपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून यावेळी पोलिस लाठीचार्ज करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करत आहेत. हे महाराष्ट्रभर दाखल केलेले मराठा आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यात लाठीचार्ज करून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्या त्या जिल्ह्यातील अभियोक्त्यांना सांगून परत घेण्यात यावेत, अशी मागणी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.