होमपेज › Marathwada › तूर खरेदी यंत्रणेवर कारवाई करा 

तूर खरेदी यंत्रणेवर कारवाई करा 

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 14 2018 10:22PMवडवणी : प्रतिनिधी 

वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची मापे वेळेवर न होण्यास संबंधित संस्थेची खरेदी यंत्रणा कारणीभूत असून शेतकर्‍यांची गैरसोय करणार्‍या या खरेदी यंत्रणा राबविणार्‍या संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव आंधळे यांनी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

दोन फेब्रुवारी पासून वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झाले.  बीडच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली बीड जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था यांच्या मार्फत तूर खरेदी केंद्रावर यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र या सहकारी संस्थेमार्फत योग्य नियोजन झाले नसल्याने वडवणीतील तुरीचे मापे वेळेवर झाले नाही असा आरोप वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव आंधळे यांनी केला आहे. सोमवारी 14 मे रोजी कोणतेही कारण नसताना तूर खरेदी केंद्र बंद ठेवल्याने सभापती आंधळे संतप्त झाले. त्यांनी थेट बीडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत तक्रार केली. वडवणी तालुक्यातील शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक वेठीस धरणार्‍या संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

बाजार समिती होती सक्षम

वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्र सुरळीत चालविण्यात कृषी औद्योगिक सहकारी संस्थेला अपयश आले त्यामुळे वडवणी बाजार समितीकडे खरेदी यंत्रणा सोपवा बाजार समिती सक्षम असल्याचे वडवणी बाजार समितीचे सभापती दिनकरराव आंधळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कळविले होते. 

ऑनलाइन नोंदीही राहिल्या

शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकर्‍यांनी कागदपत्रे दिले होते, मात्र सर्व तूर उत्पादक शेतकर्‍यांचा नोंदी झाल्या नसल्याचे आंधळे यांनी म्हटले आहे. 

तुरीचे मापे करा

वडवणी तालुक्यातील आर्ध्या शेतकर्‍यांची तूर अजूनही घरात पडून आहे. आता महिनाभरात पेरणीसाठी पैशाची गरज पडणार आहे. या परिस्थितीत सर्व तुरीचे मापे करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.