Sun, May 19, 2019 22:23होमपेज › Marathwada › डॉ. खराटे, डॉ. वाळकेंवर निलंबनाची टांगती तलवार

डॉ. खराटे, डॉ. वाळकेंवर निलंबनाची टांगती तलवार

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 12:55AMवसमत : प्रतिनिधी

वसमत शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवलेल्या मृतदेहाचे उंदरांनी व घुसीने लचके तोडल्याची घटना शुक्रवारी दि.2 मार्च रोजी घडली. यासंबधी  मृतदेह अवहेलनाप्रकरणी समितीमार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास डॉ. प्रशांत खराटे, डॉ.सतीश वाळके व कर्मचार्‍यांवर निलंबनाची कार्यवाही केली जाणार आहे, असे लेखी पत्र अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी दिल्यानंतरच संबंधित मृतदेह नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी नेला होता.

वसमत तालुक्यातील कौठा येथील संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते सुधीर खराटे यांचा गुरुवारी दि.1 मार्च रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाची पर्याप्त व्यवस्था नसल्याने शुक्रवारी सकाळी 8 वाजता शवविच्छेदन करण्याचे डॉक्टरांनी ठरवले व शवागारात मृतदेह ठेवण्यात आला, परंतु रात्री त्यांच्या मृतदेहाचे उंदरांनी व घुसीने लचके तोडल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकारानंतर संबंधित डॉ.वाळके यांना विचारणा केली असता. त्यांनी अपशब्द वापरत उद्धट भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याने यासाठी जबाबदार प्र.वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत खराटे व वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश वाळकेसह संबंधित कर्मचार्‍यांवर निलंबनाची कार्यवाही झाली पाहिजे. अशी लेखी मागणी सुधीर खराटे यांच्या नातेवाईकांनी केली. तसेच जोपर्यंत दोषी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याचा पवित्रा घेत शहर पोलिस ठाणे व रुग्णालयासमोर नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल, सहायक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी जमावाला शांत केले. 

या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला माहिती देण्यात आली. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत  पंचनामा केला. सुधीर खराटे मृतदेह अवहेलना प्रकरणी समितीमार्फत चौकशी करुन दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कार्यवाही केली जाईल. असे लेखी पत्र अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टेहरे यांनी दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. उपजिल्हा रुग्णालयाचे प्र.वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत खराटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीष वाळके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली नाही. तर मंगळवारी दि.6 मार्च रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.