हिंगोली : प्रतिनिधी
पन्नास हजाराची लाच घेतल्या प्रकरणात निलंबित असलेल्या तलाठ्याने खासगी रूग्णालयासह शासकीय रूग्णालयातील दोन महिलांच्या गळ्यातील पोत चोरून नेल्या प्रकरणी निलंबित तलाठ्यास हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बेड्या ठोकल्या. महसूल विभागात लाचखोरीमुळे बदनाम झालेल्या सुभाष बोथीकर वय 40 वर्ष रा.नाईकनगर हिंगोली या निलंबित तलाठ्याने चोरीचा धंदा सुरू केल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे तलाठी म्हणून कार्यरत असतांना सुभाष बापुराव बोथीकर याला 9 नोव्हेंबर 2017 रोजी एका शेतकर्याकडून पन्नास हजाराची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणावरून त्यास महसूल विभागातून निलंबीत करण्यात आले होते. जामीनावर सुटलेल्या निलंबीत तलाठ्याने चोरीचा सपाटा लावल्याने तो बुधवारी हिंगोली शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील प्रिती प्रवीण शिंदे वय 25 वर्ष या महिलेवर उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास प्रिती शिंदे व त्यांची आई विश्रांती घेत असतांना शिंदे यांच्या आईच्या गळ्यातील पोत हिसकावून पळ काढला. दोघी मायलेकींनी पाठलाग करीत आरडाओरड केल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या जमादार जि.एल.पांडे, के.एस.चिलगर यांनी पाठलाग करून सुभाष बोथीकर याच्या मुसक्या आवळल्या. प्रिती शिंदे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, दि.8 मे रोजी शहरातील एनटीसी भागात असलेल्या माहूरकर यांच्या खासगी दवाखान्यातून उपचारासाठी दाखल असलेल्या स्वाती अनिल हाके यांच्या गळ्यातील तीन ग्रामची सोन्याची पोत चोरून नेली होती. दवाखान्यातील सिसीटीव्हीमध्ये बोथीकर हा कैद झाला. शासकीय रूग्णालयातून चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या बोथीकर यांनीच स्वाती हाके यांची पोत चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनिल हाके यांच्या तक्रारीवरून निलंबीत तलाठी बोथीकर यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय रूग्णालयातील चोरीला गेलेले मंगळसूत्र ताब्यात घेतले आहे. एकुण मुद्देमाल जवळपास 20 हजाराचा असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक मैराळ यांनी दिली.