Thu, May 23, 2019 14:26
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › आ.बाळापूर पोलिसांनी घेतले गाडीसह तीन संशयित ताब्यात

आ.बाळापूर पोलिसांनी घेतले गाडीसह तीन संशयित ताब्यात

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:30PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍यांचे सत्र थांबता थांबत नव्हते. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री सुमारास आ.बाळापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयित चोरट्यांचा पाठलाग करून पिकअप गाडीसह तिघांना  ताब्यात घेतले आहे. सदरील तीन आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यात अनेक चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पोनि व्यंकट केंद्रे यांना अर्धापूर भागात चोरट्यांच्या पाठीमागे काही जण लागल्याची माहिती मिळाली. त्यातच चारचाकी लोडिंग वाहनात बसून पसार झाल्याच्या माहितीवरून चालक व पोकाँ भालेराव यांना घेऊन वारंगा-बाळापूर रस्त्यावर गस्तीवर असताना दाती ते कुर्तडी दरम्यान एक पीकअप गाडी तुफान वेगाने येत असल्याचे दिसले. 

त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करीत आ.बाळापूर बसस्थानकाजवळ सदर वाहनाच्या पुढे पोलिस वाहन आडवे लावून थांबविण्यात आले. ठाणेदार व एका कर्मचार्‍याने संशयित तिघांना ठाण्यात आणले. यावेळी संशयितांकडून लोखंडी हूक, आकडे, शटर वाकविण्यासाठी टॉम्या, सबल आदी साहित्य आढळून आले. यामध्ये आरोपी सुनीलसिंग ऊर्फ सोनुसिंग गुलाबसिंग बावरी वय 20 वर्षे, पंजाबसिंग धरमसिंग टाक वय 32 वर्षे दोघे रा.इंदिरानगर कळमनुरी तर पिकअप गाडीचा चालक-मालक चंदनलाल सूरजलाल जैस्वाल वय 56 अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यावेळी पिकअप गाडी क्र.एमएच 29 एच 1381 व संशयितांचे साहित्य जप्‍त करण्यात आले. 

आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांकडून चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे. तपास फौजदार तानाजी चेरले हे करित आहे.