Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Marathwada › सुरेश धस यांच्या विजयाने आष्टी, पाटोद्यात दिवाळी

सुरेश धस यांच्या विजयाने आष्टी, पाटोद्यात दिवाळी

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:38PMबीड/आष्टी : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुरेश धस यांचा विजय होताच आष्टी, पाटोदा व शिरूरमध्ये नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत दिवाळी साजरी केली. आष्टी व पाटोदा येथील चौका-चौकात कार्यकर्त्यांनी फटके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे डोळे लागले होते. या निवडणुकीचा निकाल लांबल्याने कार्यकर्त्यांची धाक-धूक वाढली होती. अशा परिस्थितीत सुरेश धस विजयी झाल्याने कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. 

निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळपासून सुरू झाली. सुरुवातीपासून सुरेश धस हे आघाडीवर आहेत याचे मेसेज व्हाट्सअ‍ॅपवरून पाठविले जात होते. यामुळे आष्टी, पाटोदा व शिरूरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. आष्टीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती कॉम्प्लेक्स, नवनिर्वाचित आ. सुरेश धस यांचे निवासस्थान, भीमनगर शहरातील या भागासह तालुक्यातील कडा, डोईठाण, धानोरा, धामनगावसह तालुक्यातील गावागावात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पाटोदा शहरातील फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. तालुक्यातील कुसळंब, डोंगरकिन्ही, अंमळनेर, शिरूरसह पिंपळनेर, मातोरी आदी ठिकाणीही कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून व फटाक्यांची आतषबाजी करीत धस यांच्या विजयाचा आनंद साजरा केला. 

गेवराईत आनंदोत्सव

सुरेश धस यांचा विजय होताच गेवराईमध्ये आ. लक्ष्मण पवार यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, जि. प.सदस्य प्रल्हाद माने, पांडुरंग थडके, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी, मधुकर वादे, नगरसेवक राजेंद्र आर्दड, शेख फिरोज, काशीनाथ पवार, मजूर बागवान, मुन्ना सेट, संजय ईगळे, कृष्णा काकडे, धम्मपाल सौदरमल, जमील सेट, भगवान घुबार्डे, छगन अप्पा, अरुण मस्के, जानमहमद बागवान, आप्पासाहेब कानगुडे, राहुल खडागळे, याहिया खॉन, किशोर धोडलकर, बाळासाहेब सानप, विलास सुतार आदी उपस्थित होते.

सुरेश धस दर्शनासाठी गोपीनाथ गडावर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होताच सुरेश धस यांनी परळी येथील गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने होते.

तर त्यांनी राजकारण सोडावे : पालकमंत्री मुंडे

ज्यांना अंतर्गत राजकीय खेळ्या खेळता येत नाहीत, त्यांनी राजकारण सोडावे, अशी खोचक टीका सुरेश धस यांच्या विजयानंतर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली. हा विजय ऐतिहासिक असल्याच्याही त्या म्हणाल्या. प्रत्येकाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडल्याने हा विजय शक्य झाला आहे. उमेदवार निवडीपासून वजाबाकीचे राजकारण सुरू झाले ते थेट निकालापर्यंत. अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत उमेदवार देण्याची नामुष्की म्हणजे राजकारणातील अपरिपक्वता असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

जेसीबीने उधळला गुलाल

निकालानंतर सुरेश धस यांच्या विजयी मिरवणुकीत दोन जेसीबींच्या सहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे धस कुटुंबीयांनी देखील या मिरवणुकीत सहभागी होत विजयोत्सव साजरा केला. 

पहाटेपासून वाहनांचा ताफा उस्मानाबादकडे

या निवडणुकीत सुरेश धस विजयी होतील याची खात्री कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे मंगळवारी पहाटेपासून वाहनांचा ताफा उस्मानाबादकडे रवाना झाला होता. कार्यकर्त्यांनी या वाहनांवर सुरेश धस यांचे फोटोही लावले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजीही केली.

आताची राष्ट्रवादी तोडपाणी करणार्‍यांची

विजयी मिरवणुकीनंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली. राष्ट्रवादीला सत्ता काळात मराठा, धनगर आरक्षण देता आले नाही, आता मात्र जातीयवादी राजकारण करीत आहेत. यावेळी सुरेश धस यांनी आर.आर.पाटील यांचीही आठवण काढली. आताची राष्ट्रवादी आर.आर. पाटलांची राहिली नसून ती तोडपाणी करणार्‍यांची झाल्याची टीकाही धस यांनी केली.