Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Marathwada › विजयानंतर सुरेश धस गोपीनाथ गडावर नतमस्तक 

विजयानंतर सुरेश धस गोपीनाथ गडावर नतमस्तक 

Published On: Jun 13 2018 8:10AM | Last Updated: Jun 13 2018 8:10AMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी निवडून येताच पांगरी येथील गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आपला विजय साहेबांना समर्पित केला, साहेबांनी मला प्रथम आमदार केले आणि पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे मी पुन्हा आमदार झालो आहे. मुंडे घराण्याचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही अशा शब्दांत आ. सुरेश धस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बीड-लातूर-उस्मानाबाद विधान परिषद मतदार संघातून विजयी होताच धस यांनी थेट गोपीनाथ गड गाठला. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी स्वतःच गोपीनाथ मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणा दिल्या. त्यांनी मुंडे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, ‘‘मुंडे साहेबांमुळेच मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आता त्यांच्या कन्या ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे आमदार झालो आहे. ज्यांच्यामुळे मी राजकारणात यशस्वी झालो त्यांच्या चरणी मी नतमस्तक झालो आहे.  आयुष्यभर ना. पंकजाताई मुंडे यांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

याप्रसंगी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. धस यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जि. प. समाजकल्याण सभापती संतोष हंगे, जि. प. सदस्य राणा डोईफोडे आदी होते.