Wed, Mar 20, 2019 13:01होमपेज › Marathwada › रस्त्याला मंजुरी तत्वत:; भांडणात केली पूर्तता 

रस्त्याला मंजुरी तत्वत:; भांडणात केली पूर्तता 

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 16 2018 12:12AMआष्टी : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल लागून महिनाभराचा कालावधी लोटला नाही तोच धस-धोंडे यांच्यात खटका उडाला आहे. रस्त्याला तत्वत: मंजुरी मिळाल्यानंतर आपणच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्याचा दावा दोन्ही आमदार करत आहेत. रस्ता विकासासाठी साधी तत्वत: मान्यता मिळाली असताना दोन्ही आमदारांनी श्रेय घेण्यावरून भांडणाची मात्र पूर्तता केली आहे. या प्रकारानंतर श्रेय कोणीही घ्या पण रस्त्याला पूर्णत: मान्यता तरी मिळू द्या, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. 

सुरेश धस यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये : आ.भीमराव धोंडे
गेल्या दोन वर्षांपासून आपण तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी पाठपुरवठा करत आहोत. गडकरी यांची मी भेट घेतल्यानंतर रस्त्याच्या कामासाठी त्यांनी तत्वत: मंजुरी दिली. मी मंजूर केलेल्या या कामाचे श्रेय आ. सुरेश धस यांनी घेऊ नये असे आ. धोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
आष्टी येथे आ.सुरेश धस यांनी आपण केलेल्या कामाचे श्रेय आपण घेत असल्याचा उल्लेख केला होता. त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी आ.भीमराव धोंडे यांनी आनंद भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना आ.धोंडे म्हणाले की, आपण गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यासाठी पाठपुराव करत आहोत. याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. मी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि वारंवार नितीन गडकरी यांची भेट घेतल्यामुळे तत्वत: मंजुरी मिळाली आहे. पण नव्याने आमदार झालेले सुरेश धस मतदार संघातील जनतेची दिशाभूल करत आहेत. दिल्लीला जाऊन मंजुरी आणल्याचे सांगत आहेत. वास्तविक पाहता अशी मंजुरी दोन दिवसांत मिळत नसते, हे सर्वांना माहीत आहे. पाठपुरावा केल्याचा माझ्याकडे पुरावा आहे, धस यांनी देखील पुरावा द्यावा, असे आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेत सुरेश धस यांना दिले. 
मी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय धोंडे घेत आहेत : आ.सुरेश धस
तालुक्यातील वनवेवाडी, चिंचपूर, आष्टा, जामगाव, टाकळशिंग ते हिंगनी असा 47 कि. मी. व देऊळघाट ते मच्छिंद्रनाथ गड या 40 कि. मी. अंतराच्या दोन रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीनंतर या रस्ता कामांना तत्वत: मान्यता मिळाली असल्याचा दावा करत मी केलेल्या कामाचे श्रेय धोंडे यांनी घेऊ नये असे आ. सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  
पत्रकार परिषदेत बोलताना आ. धस म्हणाले, की नितीन गडकरी यांची भेट घेताच आ.भीमराव धोंडे यांनी तातडीने प्रसिद्धी पत्रक काढून मतदार संघातील जनतेला चुकीची माहिती दिली. मतदार संघात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामांना गती मिळणार आहे. विकास कामांना मंजुरी मिळवून आणण्यात आम्ही कमी पडणार नाहीत, परंतु ज्या कामांना ज्याने मंजुरी आणली आहे त्या कामाची प्रसिद्धी त्यानेच करावी. मी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय आ. धोंडे यांनी घेऊन जनतेची दिशाभूल करू नये असे ते म्हणाले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक कोटी पन्नास लक्ष रुपयांची मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.