होमपेज › Marathwada › ‘आमदारकी’च्या चर्चेने धस समर्थकांमध्ये उत्साह

‘आमदारकी’च्या चर्चेने धस समर्थकांमध्ये उत्साह

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाटोदा : महेश बेदरे

गत वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी आपल्या समर्थक पाच सदस्यांचे पाठबळ भाजपच्या पाठिशी उभे करून राष्ट्रवादी ला हादरा देत राम राम ही केला. आता त्यांना भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

सुरेश धस यांच्या थेट भूमिकेमुळे त्यांना लगेचच भाजप प्रवेश होईल अशी राजकीय जाणकारांबरोबरच कार्यकर्त्यांना देखील अपेक्षा होती. मात्र त्यानंतर आतापर्यंत धस यांचा भाजप प्रवेश रखडलेलाच आहे, मात्र आता उस्मनाबाद - बीड - लातूर  स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी धस यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

त्यामुळे पाटोदा तालुक्यातील गांव, वाडी, वस्त्यांवरील धस समर्थकांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. इतक्या दिवस रखडलेल्या पक्ष प्रवेशामुळे अस्वस्थ असलेल्या धस समर्थकांना ही बातमी निश्चितच दिलासा देणारी ठरणार आहे व पालकमंत्री पंकजा मुंडे या देखील धस यांच्याच पारड्यात वजन टाकणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मतदार संघातील शेकडो ग्रामपंचायती, तीन नगरपंचायती, पाच ते सहा जिल्हा परिषद सदस्य असे वर्चस्व असणार्‍या धस यांचा रखडलेला भाजप प्रवेश कार्यकर्त्यांना अस्वस्थच नाही तर संतप्त करणारा ठरत होता. आता सर्वत्र विधान परिषद निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्याने निर्णयाची अपेक्षा असणार्‍या धस समर्थकांची अपेक्षा आता वाढत चालली आहे.

सुरेश धस यांचे मौन

उस्मनाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक आता अगदी जवळ आली असून त्यापूर्वी सुरेश धस यांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना विधान परिषदेची संधी मिळू शकते का, अशी ही चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. स्वतः सुरेश धस यांनी अद्याप या बाबतीत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु सध्याच्या एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री पंकजा मुंडे या मात्र धसांच्या राजकीय पुनर्वसनासाठी अनुकूल असल्याचे एकंदर चित्र असून मागील काही दिवसांमध्ये या अनुषंगाने राजकीय हालचाली देखील सुरू असल्याचे दिसत असल्याने धस समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंकजा मुंडेंचे वक्तव्य ठरणार खरे?

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी धस यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेतले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की आम्हाला सहकार्य करणार्‍यांना आम्ही विसरत नाहीत, तसेच एका म्यानात दोन तलवारी बसत नसतील परंतु एका भात्यात मात्र अनेक ‘बाण’ बसू शकतात व त्या धनुष्याची प्रत्यंचा (दोरी) मात्र आपल्या हाती आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पुढील चित्र काहीसे स्पष्ट तर झाले होते व आता एकंदर परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांचे ते वक्तव्य खरे ठरते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धस यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी केली जाऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक चुरशीची होणार एवढे मात्र नक्की


  •