Fri, Aug 23, 2019 21:10होमपेज › Marathwada › शह-काटशहात आ. सुरेश धस यांची खेळी यशस्वी

शह-काटशहात आ. सुरेश धस यांची खेळी यशस्वी

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 24 2018 9:55PMपाटोदा : महेश बेदरे

सुरेश धस यांनी भाजप पक्ष प्रवेश पासून सुरू असलेल्या शह काटशहाच्या राजकारणात आपली खेळी यशस्वी करून दाखवली असून आता त्यांच्या आमदारकीने या मतदारसंघात भाजपची ताकद दुप्पट वाढणार आहे. असे असले तरी या नंतर गटबाजीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे मात्र नक्की.

आपल्या  राजकारणातील धस का तंत्राने व रांगड्या शैलीने  राज्याचे आपल्याकडे लक्ष वेधणार्‍या माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या भाजप पक्ष प्रवेशाची काही दिवसांपूर्वी केवळ चर्चाच सुरू होती. असे असताना अचानक उस्मनाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघात भाजपने थेट त्यांना उमेदवारी दिली व ज्या मतदारसंघात आत्तापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते व मतदार ही जास्त होते, त्या ठिकाणी धस यांनी विजय मिळवत आपण राजकारणातील मुरब्बी व्यस्थापन गुरू असल्याचे सिद्ध करून  दाखविले.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी  सुरेश धस यांनी अत्यंत अनपेक्षित पणे भाजपला साथ दिल्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे समर्थकांमध्ये देखील संभ्रम होता, या घडामोडीनंतर धस यांचा लगेचच भाजप प्रवेश होईल असा समर्थकांबरोबरच  राजकीय जाणकारांचा देखील होता, मात्र त्या नंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाची केवळ चर्चाच सुरू राहिली व त्याच वेळी त्यांच्या राजकिय वाटेत मोठे अडसर असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यानच्या काळात पालकमंत्री पंकजा मुंडे मात्र धसांच्या पाठिशी ठाम उभ्या राहिल्या. त्यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमाध्ये देखील साथ देणार्‍यांना विसरणार  नसल्याचे  सांगितले, मात्र त्या नंतरही भाजपचे विद्यमान आ. भीमराव धोंडे व सुरेश धस यांच्यात ग्राम पंचायत निवडणुकीतील श्रेयवादावरून रंगलेला कलगीतुरा हा भविष्यातील गटबाजी व अडथळ्यांची दिशा स्पष्ट करणारा ठरत होता, मात्र धस यांनी अत्यंत चाणाक्षपणे खेळी खेळत विधान परिषदेची उमेदवारीही मिळवली व तितक्याच तरबेजपणे यशस्वीही करून दाखवली. आष्टी-पाटोदा-शिरूर या संपूर्ण मतदारसंघात सुरेश धस यांची मोठी ताकद आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही धस यांनी पाटोदा-आष्टी नगरपंचायतसह अन्य स्थानिक निवडणुकांत मोठे यश मिळवले होते. त्यामुळे धस यांच्यासारख्या महात्त्वाकांशी नेत्यामुळे या ठिकाणी भाजपची ताकद वाढणार हे नक्की आहे. तरीही येणार्‍या काळात या ठिकाणी गटबाजीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या मतदार संघात आ. सुरेश धस व आ. भीमराव धोंडे यांच्या कार्यकर्त्यांत सलोखा राहील, याची काळजी नेत्यांसह पक्षाला घ्यावी लागणार आहे.