Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Marathwada › प्रमुख नेत्यांच्या फाेटोवरून गटबाजी

प्रमुख नेत्यांच्या फाेटोवरून गटबाजी

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:19AMपाटोदा : महेश बेदरे

विविध कार्यक्रमांच्यानिमित्ताने शहरात लावलेल्या बॅनरमधील नेत्यांच्या फोटोंचा लंपडाव हा या ठिकाणच्या प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजीची नांदी ठरणारा आहे. पाटोदा तालुक्यातीलच नव्हे तर मतदार संघातच असणार्‍या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मागील काही काळात अत्यंत मोठ्या घडामोडी घडल्यामुळे संपूर्ण  राजकीय वातावरणच ढवळून निघाले  आहे. या बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक नेत्यांच्या कोलांटउड्यांमुळे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच ससेहोलपट झाल्याचे दिसून येत आहे, मात्र आता सर्व वातावरण स्थिर होण्याचे चित्र दिसत असतानाच या दोन्हीही पक्षांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

माजी राज्यमंत्री सुरेश धस हे आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार झाले आहेत, या मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार भीमराव धोंडे व आ. धस यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य मतदार संघाला चांगलेच परीचित आहे. त्यामुळे धस जरी आता पक्षात आले असले तरीही अर्थातच त्यांचे दोन गट स्पष्ट पणे दिसून येतात एवढेच नाही तर खुद्द या दोन नेत्यांमध्येही नेहमीच काहींना काही वाद (श्रेय) सुरू असतात. त्यांच्याप्रमाणेच या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यामध्ये देखील कुरघोडी सुरू असते. याचा प्रत्यय अनेकवेळा जाहीरपणे येतो. नुकताच आ.भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी काही बॅनर लावण्यात आले. यातील काही बॅनवर आ. धस यांच्या फोटोला स्थान दिले नाही तर इतर काही कार्यक्रमांना धस समर्थकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे आता या छोटया कुरघोड्याही गटबाजीच्या नांदी ठरणार्‍या दिसत आहेत.

भाजप प्रमाणेच राष्ट्रवादीत ही सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे, माजी जिल्हा परीषद सभापती महेंद्र गर्जे यांनी धस यांची साथ सोडत राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसातच बाळासाहेब आजबे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीची घडी हाती बांधली. त्यानंतर अनेक वेळा गर्जे व आजबे यांच्यात सर्व काही अलबेल नसल्याचे दिसून आले. दोन्ही नेत्यांचे समर्थक हे दुसर्‍या नेत्याला आपल्या बॅनरवर फोटोत टाळतानाच दिसले, तर आता नुकताच तालुक्यातील दुसरे बडे नेते अप्पासाहेब राख हे ही राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत व त्यांचा पक्षात सक्रीय झाल्याबद्ल गर्जे व आजबे यांनी वेगवेगळा सत्कार केला त्यामुळे आता येथेही चित्र स्पष्ट झाले आहे. एकंदरीत बड्या नेत्यांच्या जवळीतेवरून कार्यकर्त्यांची कोंडी होत असून लहान-लहान गोष्टीवरूनही वाद होत असल्याचे दिसत आहे.