Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Marathwada › हिंगोलीतील गटबाजीचा आघाडीला फटका

हिंगोलीतील गटबाजीचा आघाडीला फटका

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 10:44PMहिंगोली : गजानन लोंढे

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मतमोजणी निकाल अपेक्षेप्रमाणे गुरुवारी जाहीर झाला. यात शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी बाजी मारली. सुरुवातीपासूनच बाजोरीया यांनी शिस्तबद्धरीत्या प्रचार यंत्रणा राबवून आघाडीच्या मतांना खिंडार पाडले होते. तर दुसरीकडे आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांना निवडणुकीत अती आत्मविश्‍वास नडला. बाजोरिया यांच्याकडून थेट मतदारांशी संपर्क साधण्यात येत होता. तर दुसरीकडे देशमुख मतदारांशी संपर्क साधण्यात कमी पडल्याने निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुरेश देशमुख यांचे सुरुवातीला पारडे जड दिसत होते. आघाडीचे जवळपास 296 मतदार असल्यामुळे अकोल्याहून आलेले विप्लव बाजोरिया यांना ही निवडणूक जड जाईल असे चित्र सुरुवातीच्या काळात दिसून आले, परंतु बाजोरिया यांनी शिवसेनेच्या मतदारांना आपलेसे करीत भाजपची मोट बांधून यशस्वीरीत्या प्रचार यंत्रणा राबविली. मतदानाच्या दोन दिवस अगोदर अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांचाही पाठिंबा मिळविण्यात बाजोरिया यशस्वी झाल्याने देशमुखांच्या गडाला खर्‍या अर्थाने धक्‍का देण्यात यशस्वी ठरले. देशमुख यांनी केवळ स्थानिक पुढार्‍यांना हाताशी धरून मोर्चे बांधणी सुरू ठेवली. परंतु त्यांचा थेट मतदारांशी संपर्क झालाच नसल्याने आघाडीतील नाराज मतदारांनी अखेर सेनेच्या बाजोरिया यांच्याशी संधान बांधल्याचे निवडणुकीतील निकालावरून समोर आले आहे.

देशमुख यांनी मतदारांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवत ठेवले.  त्यांनी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व स्थानिक पुढार्‍यांच्या भरवशावर प्रचार यंत्रणा राबविली. तर बाजोरिया यांनी स्वतः मतदारांशी संपर्क साधून यशस्वीरीत्या बोलणी सुरू ठेवली. एकीकडे देशमुख यांच्याकडून रसद पुरवठ्यासंदर्भात आखडता हात घेतलाजात असतांना दुसरीकडे बाजोरिया यांनी सोडलेला मोकळा हात मतदारांना आकर्षित करणारा ठरला. आघाडीचे संख्याबळ जास्त असूनही निवडणुकीत बाजोरिया यांनी चमकदार कामगिरी करून तब्बल 35 मतांच्या फरकाने बाजी मारली. देशमुख यांना हक्‍काच्या मतदारांनी साथ दिली नसल्याचे चित्र दिसते.. 

निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर बाजोरिया यांनी आघाडीतील नाराजांना आपलेसे करीत संधी साधली. तर दुसरीकडे देशमुख यांना संख्याबळाचा विचार करता, आमदारकीची संधी चालून आली होती. परंतु त्यांनी सुरवातीपासूनच मतदारांशी दूर राहणे पसंत केल्याने त्यांची खेळी अंगलट आल्याचे निकालाच्या आकड्यावरून समोर आले. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाजोरिया यांनी केवळ मतदारांची चाचपणी करून मतदारांना शब्द देत प्रचार सुरू ठेवला. 

या निवडणुकीत हापूस आंब्याचीही बरीच चर्चा झाली. मतदारांना आंब्याचे वाटप करण्यात आल्याचे म्हटले जाते. देशमुख यांनी मात्र सुरवातीपासूनच प्रचार यंत्रणा राबविण्यावर दुर्लक्ष केल्याने त्यांच्या पदरी पराभव आला. ऐन वेळी राष्ट्रवादीच्या ताब्यातून काँग्रेसला जागा सोडत उमेदवारी देशमुखांना देण्यात आली होती. परंतु देशमुख यांना या संधीचे सोने करता आले नाही. एकूणच सेनेच्या उमेदवाराकडून चाणक्षरीत्या व्यवहार झाल्याने आघाडीतील मते फुटली. देशमुखांनी मात्र रोखीच्या व्यवहाराबाबत कायम नकार घंटा दिल्याने हक्‍काची मते गमावली. आमदारकीची नामी संधी असताना अकोल्याहून आलेले बाजोरिया यांनी अवघ्या पंधरा दिवसांत आमदारकी पदरात पाडून घेतल्याने पक्षाबरोबरच स्वतःची राजकीय नुकसान करून घेतल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.या निवडणुकीमुळे हिंगोलीशी जवळीक असणारे विप्लव हे विधानपरिषदेत पोहचले. परभणीपेक्षा हिंगोलीच्या मतदारांनी त्यांना बर्‍यापैकी समर्थन दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत या निकालाचे परिणाम जाणवतील यात काहीच शंका नाही.