Sun, May 26, 2019 20:41होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या, माजलगाव येथे मुंडण

मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या, माजलगाव येथे मुंडण

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 05 2018 1:30AMबीड : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी शिक्षक, प्राध्यपक यांच्या समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परळी येथे आबासाहेब पाटील यांनी क्‍लिपमधून बदनामी झाल्याची तक्रार दिली, तर माजलगावमध्ये तरुणांनी मुंडण आंदोलन केले. शनिवारी दोनशे दुचाकीस्वारांनी रॅली काढून परळी येथे जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. तर, केज, गेवराई येथेही ठिय्या आंदोलन सुरूच आहे. केज येथील आंदोलकांना गावोगावचे लोक भाकरी देऊ लागले आहेत, दरम्यान बीड जिल्ह्यात दोघांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली.

अन्यायाला शिक्षकांनी फोडली वाचा

बीड : शनिवारी बीडमध्ये मराठा शिक्षक, प्राध्यापक समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. या मोर्चामध्ये शिक्षक, प्राध्यपक यांनी आपल्या गणवेशात सहभाग घेतला होता. मराठा समाजास आरक्षण द्यावे, मेगा भरती रद्द करावी, कोपर्डी येथील आरोपींना झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलनामध्ये दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्महत्या केल, त्यांना शहीद म्हणून घोषित करावे आदी मागण्या यावेळी शिक्षक, प्राध्यपकांनी केल्या.

या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही प्राध्यपक, शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. मराठा समाजास आरक्षण नसल्याने विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी, शिष्यवृत्ती नसल्याने विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी आदी वेदना शिक्षकांनी मनोगतातून व्यक्त केल्या. मराठा समाजास आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाभरातील माध्यमिक शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यपक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सदरील मोर्चास दुपारी दोन पर्यंत वेळेची मुदत देण्यात आली होती. शिक्षकांनी मोर्चातही शिस्त दाखवित दोन वाजण्यास पाच मिनिटे बाकी असतानाच मोर्चाचा समारोप केला. 

केज येथे राजकीय पक्ष, संघटनांचा पाठिंबा

केज : केज येथील आंदोलनाला विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला व ठिय्या आंदोलनात सहभाग घेत या मागणीला पाठिंबा दिला.  या ठिय्या आंदोलनाला केज तालुका वकील संघ, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह मतदार संघाच्या आ. संगीता ठोंबरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.  राष्ट्रवादीचे नेते नंदकिशोर मुंदडा, नगरपंचायतचे गटनेते हारून इनामदार, विजयकांत मुंडे, नंदू मोराळे, एसबीसी महिला जिल्हा अध्यक्ष विद्या तारळकर, शिवसेनेच्या रत्नमाला मुंडे, माजी सभापती राजेसाहेब देशमुख, दत्ता धस, शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव, डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनीही आंदोलनाला आणि आरक्षण मागणीला पाठिंबा दिला आहे. 

आबासाहेब पाटील यांची पोलिसात तक्रार

परळी : तहसील कार्यालयाच्या मैदानात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या बाबतची पुणे येथील रुपाली पाटील व आ.नितेश राणे यांची संभाषणाची क्लिप सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमामध्ये टाकण्यात आली. यामुळे आंदोलकांची बदनामी झाली असून आमच्या जीवतास धोका निर्माण झाला आहे, तसेच माझ्या नाहक बदनामीचे षडयंत्र रचून आंदोलन स्थगित करून माझी समाजातील प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याच्या अशयाची तक्रार शनिवार (दि.4) रोजी आबासाहेब पाटील यांनी परळी शहर पोलिसात दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन हे साडेपाच कोटी मराठा बांधवांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने चाललेले आंंदोलन आहे. अशा आंदोलनाला महामंडळ व पैसे मागण्याचे बिनबुडाचे आरोप करून माध्यमातून बदनाम करून माझ्या विषयी विष पेरण्याचे काम केले. तरी पोलिस प्रशासाने या आ.नितेश राणे व रुपाली पाटील यांच्या संभाषणाची चौकशी करून ही क्लिप सर्वत्र व्हायरल करणार्‍या रुपाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसेच मला व माझ्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात यावे असे तक्रार अर्जात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. हा तक्रार अर्ज अंबाजोगाई पोलिस उपाअधिक्षक सुरेश गायकवाड, परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक डि.के.शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

ठिय्या आंदोलनास तरुणांचा पाठिंबा

परळी : परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील पिंपळनेर आणि नाळवंडी जिल्हा परिषद सर्कल मधील  500 ते 600  तरुणांनी दुचाकी रॅली काढली. हे तरुण दुचाकीवरून घोषणा देत परळी येथे आले होते. त्यांनी परळीत येऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. तर माजलगाव येथील मराठा डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आंदोनस्थळी आबासाहेब पाटील यांची भेट घेतली. माजलगाव मधील मराठा डॉक्टरांचा या आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र त्यांनी दिले.

क्लिप प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात तक्रार 

परळी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी महामंडळ व पैसे मागीतल्याची पुणे येथील रुपाली पाटील व आ. नितेश राणे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी या प्रकरणी परळी येथील शहर पोलिस ठाण्यात ऑडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी तथा जीवितास धोका निर्माण केल्याबाबत तक्रार दाखल केली आहे.