होमपेज › Marathwada › तरुण-तरुणीची विष घेऊन आत्महत्या

तरुण-तरुणीची विष घेऊन आत्महत्या

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:47AMजाफराबाद : प्रतिनिधी

येथील एस. टी. डेपो मागील हनुमान मंदिरात नळविहिरा येथील तरुण-तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवार (6) रोजी दुपारी घडली.

देउळगावराजा तालुक्यातील भायगाव येथील प्रियंका बिबे (17) व जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथील अनंता सकलादी जगताप (20) हे दोघे नळविहिरा येथे मामाकडे राहात होते. अनंता अ‍ॅपे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत होता. मंगळवारी दुपारी 12 वाजता प्रियंका व अनंता यांनी जाफराबाद येथे येऊन एस. टी. डेपो मागे असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन विष घेतले. दोघांना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. या घटनेबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. जाफराबाद पोलिसांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी याबाबत टेंभूर्णी पोलिसांनी एमएलसी दाखल केल्याचे सांगितले.