Tue, May 21, 2019 22:11होमपेज › Marathwada › जिल्ह्यात तब्बल 45 हजार हेक्टरवर ऊस

जिल्ह्यात तब्बल 45 हजार हेक्टरवर ऊस

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:33PMसोनपेठ : राधेश्याम वर्मा 

शेतकर्‍यांंसाठी नगदी पीक म्हणून नोंद असणार्‍या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांच्यापुढे आतापासूनच या पिकाचा प्रश्न उभा राहिला. मागील दोन वर्षांपासून बंद असलेला तालुक्यातील सायखेड येथील महाराष्ट्र शुगर कारखाना व पाथरी येथील रत्नप्रभा यावर्षी तरी चालू होणार का नाही याबाबत साशंकता आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतातुर आहेत. यावर्षी जिल्ह्यात तब्बल 45 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे.  

जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांपैकी चारच कारखाने यावर्षी सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यात मोहटादेवी साखर त्रिधारा, गंगाखेड साखर कारखाना माखणी, योगेश्वरी साखर कारखाना लिंबा, बळीराजा साखर कारखाना कावलगाव या कारखान्यांचे बॉयलर पेटणार असल्याचे चिन्हे आहेत. पाथरी येथील रत्नप्रभा आणि सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी साखर कारखान्याची धुराडी बंद राहणार असल्याचे समजते. यामुळे शेतकर्‍यांच्या उसाचे मोठे नुकसान होणार   आहे. यावर्षी 2018-19 हंगामात 16,565 हेक्टर उसाची नव्याने लागवड झाली. जुना आणि खोडवा 29,135 हेक्टर ऊस यापूर्वीचा होता. यावर्षी तब्बल साडेसोळा हजार हेक्टर  क्षेत्र वाढल्याने शेतकर्‍यांच्या नशिबी संघर्ष येणार असल्याचे दिसते. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने  माजलगाव उजव्या कालव्यावर तसेच मुदगल बंधार्‍यांमध्ये मुबलक पाणी असल्याने  उसाच्या पिकाची मोठी लागवड झाली, परंतु तालुक्यात एकमेव असलेला महाराष्ट्र शुगर  कारखाना चालू होणार का नाही? याबाबत   साशंकता आहे. लिंबा येथील योगेश्वरी कारखान्यात तालुक्यातील शेतकरी ऊस गाळप करतात. कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्याने व गंगाखेड शुगरच्या कार्यक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप होईल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. तालुक्यात मागील वर्षी 485 हेक्टरवर उसाची लागवड झाली होती, परंतु यावर्षी 738 हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. राज्य शासनाने पुढाकार घेऊन हे कारखाने चालू करण्याची मागणी होत आहे.