होमपेज › Marathwada › उपविभागीय अधिकारी कार्यालयास आग

उपविभागीय अधिकारी कार्यालयास आग

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 9:11PMपरभणी : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत येणार्‍या मांजरा प्रकल्प (भू-विकास) उपविभाग क्रमांक 2 च्या उपविभागीय अधिकारी कार्यालयास आग लागली. यामध्ये निम्न दुधना प्रकल्पाच्या भूसपांदनच्या महत्त्वपूर्ण अभिलेख्यांसह इतर साहित्य जळाल्याची घटना सोमवारी (दि.28)  मध्यरात्री घडली.

शहरातील कारेगाव रोडवरील जायकवाडी वसाहत परिसरात सदरील उपविभागीय कार्यालय आहे.  मध्यरात्रीनंतर 2.50 च्या सुमारास याच कार्यालयाशेजारी असलेल्या जलसंपदाच्या कार्यालयातील चौकीदारास निम्नदुधनाच्या उपविभागीय कार्यालयास आग लागल्याचे समजले. त्यांनी त्वरित त्यांचे वरिष्ठ पी.एल. सोळंके यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि आगीची माहिती दिली.  अग्‍निशामन दलाच्या पथकाने  घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. दरम्यान, झालेल्या आगीत निम्न दुधना प्रकल्पाच्या उपविभागीय कार्यालयातील भूसंपादन शाखेतील भु.वि.(स्था) उपविभाग क्र.1 परभणीतील 194 मंजूर मूळ खरेदी खताचे सर्च रिपोर्ट, सातबारा व इतर कागदपत्रे, शे.अ.उपविभाग क्र.3 परभणीतील 102, शे.अ.उपविभाग क्र.1 परभणीतील 91, शे.अ.उपविभाग क्र.5 परभणी 61, शे.अ.उपविभाग क्र.4 परभणीतील 86, भूसंपादन संचिका 7, संयुक्‍त मोजणी नकाशे संचिका 25 व इतर साहित्य 3 असे 569 प्रकारचे साहित्य आगीत जळून खाक झाल्याचे उपविभागीय अधिकारी एस.आर.तिडके यांनी सांगितले.