Wed, Jul 24, 2019 12:43होमपेज › Marathwada › अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांचा ओढा लातूर, पुण्याकडे 

अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांचा ओढा लातूर, पुण्याकडे 

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 25 2018 9:41PMअंबाजोगाई  :  रवी मठपती

अंबाजोगाई शहरासह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी लातूर व पुण्याकडे ओढा वाढला आहे. खास करून अकरावी, बारावी विज्ञान शाखेचे  शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी  विद्यार्थी लातूर व पुण्याला पहिली पसंती देत आहेत. शिक्षणातील प्रचंड स्पर्धेमुळे पालकांची आर्थिक ओढाताण  पाहायला मिळते आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी पूर्व परीक्षेची तयारी तसेच एमपीएससी , युपीएससी हे  पुण्यामागचे सबळ कारण सांगितले जाते. अंबाजोगाई येथील अनेकांनी पुणे कायमस्वरूपी जवळ केले आहे. 

अंबाजोगाई येथे बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे काळाजी गरज आहे. अंबाजोगाई शहराची ओळख शैक्षणिकदृष्ट्या मराठवाड्याचे पुणे म्हणूनच आहे. औरंगाबाद येथील विद्यापीठ स्थापण्यापूर्वी अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षण संस्थेत विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. शंभर वषार्र्ंची परंपरा असलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेने प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत शिक्षण सुरू करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची सोय केली. त्याकाळी अंबाजोगाई सोडले तर औरंगाबाद व सोलापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावे लागत असे वयस्क व सेवानिवृत्त सांगतात. 

वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटीनंतर नीट, एम्स, जीपमर, जेईईसारख्या परीक्षा बंधनकारक करण्यात आल्या आहेत.या परीक्षांची तयारी महाविद्यालयात करून घेतली जात नाही. घेतलीच तर परीक्षेत यश मिळेल याची शाश्वती नसते अशी भावना विद्यार्थी, पालकांची झाली आहे. शिक्षणातील स्पर्धांमुळे पालकांची आर्थिक ओढताण वाढली आहे. अंबाजोगाई येथे   परराज्यातील तज्ज्ञ प्राध्यापक नेमून क्लासेस चालू केले, परंतु  सध्या तरी यश मिळत नसल्याचे चित्र आहे. 

स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन

वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशाऐवजी अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करून करिअर घडवू इच्छितात. दुर्दैवाने यासाठी लागणारे मार्गदर्शन व क्लासेस अंबाजोगाई शहरात उपलब्ध नाहीत. नाईलाजाने विद्यार्थ्यांना पुणे, दिल्ली गाठावे लागते. अंबाजोगाई शहरात दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण दर्जेदार व टिकून आहे. दहावीला पंचावन्न टक्के व अधिक गुण घेणारे विद्यार्थी लातूर, पुण्याला प्रवेश घेतात. केवळ नीट, जेईई परीक्षा तयारीसाठी अंबाजोगाई येथील नामांकित शिक्षण संस्थांनी शहरातच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची सोय केल्यास लातूर व पुण्याकडील लोंढा निश्‍चितपणे रोखता येणार आहे.