होमपेज › Marathwada › आयटीआय ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

आयटीआय ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 9:39PMपरभणी : प्रतिनिधी 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्रातील परीक्षांना सोमवार 5 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे, परंतु केवळ सहाच विभागातील लेखी परीक्षा होत असल्याने अन्य अठरा विभागांतील विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे जाऊन चौकशी केली. यावर त्यांनी तुमची परीक्षा ऑनलाइन होणार असल्याचे सांगताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे अचानकपणे मिळालेल्या सूचना व ऑनलाइन परीक्षेच्या शासन निर्णयाविरोधात परभणीतील विद्यार्थ्यांनी 5 फेबु्रवारी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले. 

येथील जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू असलेल्या निरनिराळ्या एकूण 22 ट्रेडचे प्रशिक्षण दिल्या जाते. अद्यापपर्यंत सर्व ट्रेडच्या परीक्षा या ऑफलाइन पध्दतीने लेखी स्वरूपात घेतल्या जात होत्या. परंतु यावर्षी सहा ट्रेड वगळून इतर 18 ट्रेडच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा ऑनलाइन होणार असल्याचे वेळापत्रक 3 फेब्रुवारी रोजी तयार करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून ऑनलाइनचे ज्ञान नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संगणकाच्या ज्ञानाचा लवलेशही नसलेल्या आय.टी.आय.मधील अनेक विद्यार्थ्यांनी शासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेतला असून शासनाने त्वरित तो रद्द करावा, विद्यार्थ्यांच्या पूर्वीप्रमाणेच परीक्षा घ्याव्यात अशा मागण्या करत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी शासन व प्रशासनाला दिला. निवेदनावर आत्माराम पुजारी, नितीन वाव्हळे, गोपाळ साबळे, मंचक सोनुले,  पूजा जुगडे, दत्ता मुळे, नितीन वाव्हळे, दळवी नामदेव, सुनिल मोरे, अमोल जाधव, मंचक सोनुले, नवनाथ कोंडरे, आत्मकार देशमुख, समीर खुरेशी, अश्‍विन ढोंबळे, शेख नवाझ,  नितीन बगाटे, प्रथमेश, स्वप्निल खिल्लारे यांच्या स्वाक्षरर्‍या आहेत.