Tue, Jun 25, 2019 21:43होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांची अडवणूक थांबवा

शेतकर्‍यांची अडवणूक थांबवा

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 9:19PMबीड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचा हरभरा, तूर ऑनलाइन, ऑफलाइनच्या गोंधळात अडकला आहे. बाजार समितीकडे ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाइनसाठी आधारकार्ड, सात-बारा व इतर कागदपत्रे दिली त्या शेतकर्‍यांना वंचित ठेवल्याचा आरोप करत शेतकर्‍यांची अडवणूक कराल तर रस्त्यावर उतरून आंदोलन असा इशारा जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या जनता दरबारात शेतकर्‍यांनी  व्यथा मांडल्या. त्यावेळी ते बोलत होते. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैर कारभार होत असून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे काम याठिकाणी होत असल्याच्या तक्रारी संदीप क्षीरसागरापर्यंत आल्यांनंतर बाजारसमितीमध्ये सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जनता दरबार घेण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांची मोठी उपस्थिती होती. 5 हजार 600 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी बाजारसमितीकडे ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता केली. यातील केवळ 2 हजार 600 शेतकर्‍यांच्याच नोंदी झाल्या. उर्वरीत शेतकर्‍यांच्या नोंदी झाल्या नसल्याने तूर आणि हरभरा विक्री करण्यासाठी बाजारसमितीत शेतकर्‍यांना खेटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. 

ज्या शेतकर्‍यांची तूर विकली गेली त्या शेतकर्‍यांच्या हाती पैसे न पडल्यामुळे प्रचंड हेळसांड होत आहे. अशा अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र फेडरेशनेचे अधिकारी, जिल्हा कृषी औद्योगिक विभागाचे अधिकारी यांच्यासमोरच शेतकर्‍यांनी  अनागोंदी कारभाराचे पुरावे मांडले. संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, बबन गवते, भाऊसाहेब डावकर, मोहन देवकते, पंडित आर्बाने, महादेव उबाळे, माउली सानप, शिवाजी जाधव, नंदकुमार कुटे, सचिन शेळके, उत्रेश्वर सोनवणे यांच्यासह शेतकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतकर्‍यांच्या व्यथा विरोधी पक्ष नेत्यांच्या कानी : शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेत संदीप क्षीरसागर यांनाविरोधी पक्षनेते धनंज मुंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. शेतकर्‍यांनी माल विकूनही पैशाची अडवून, खरेदी केंद्राच्या मनमानी कारभारामुळे शिल्लक असलेल्या शेती मालाची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. दोन दिवसांमध्ये निर्णय होणे अपेक्षीत आहे. सर्व शेतकर्‍यांची तूर, हरभरा खरेदी केंद्रामार्फतच खरेदी केला पाहिजे. अन्यथा शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा दिला.

शेतकर्‍यांनी तक्रारी आमच्याकडे द्याव्यात  ः ज्या शेतकर्‍यांनी बाजारसमितीकडे ऑफलाइन कागदपत्रे दिली आहेत त्याची पोहच पावती संबंधितांकडे आहे. ज्या शेतकर्‍यांचे ऑनलाइन कागदपत्रे झाली आहेत परंतु, एसएमएस आला नाही. खरेदी  केंद्रामार्फत तूर घेतली गेली परंतु तुरीचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. ऑनलाइन-ऑफलाइनच्या वादात तूर, हरभार्‍यांचा प्रश्न अडकून पडला  आहे. अशा शेतकर्‍यांनी सर्व पुरावे आमच्याकडे द्यावेत असे आवाहन संदीप  क्षीरसागर यांनी केले.