होमपेज › Marathwada › रखडलेल्या ‘त्या’ पुलाचे काम सुरू

रखडलेल्या ‘त्या’ पुलाचे काम सुरू

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 9:22PMपालम : प्रतिनिधी

गंगाखेड शहरालगत असलेल्या रेल्वे फाटकावरील वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून उभारल्या जाणार्‍या पुलाचे काम मागील काही दिवसांपासून बंद असल्याची बातमी दैनिक पुढारीमध्ये प्रकाशित झाली होती. यामुळे बातमी प्रकाशित होताच संबंधित कंत्राटदाराने रखडलेल्या पुलाचे काम सुरू केल्याचे पाहावयास मिळाले आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटकाजवळ उभारल्या जाणार्‍या पुलामुळे प्रमुख राज्य महामार्गावरील दोन्ही बाजूस रेल्वे वाहतुकीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. येथे  मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. अनेक वेळा छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडूनही रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

या महामार्गावरील नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूर यांसारख्या अनेक शहरांकडे जाणारा रस्ता असून याच रस्त्यावर रेल्वे प्रशासनाने मागील एक वर्षापूर्वी वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता एका पुलाचे बांधकाम सुरू केले होते. हेे काम मागील चार ते पाच महिन्यांपासून बंद असल्याने या मार्गावर जाणार्‍या वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पुलामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने नेहमीच येथे अपघाताच्या घटना घडत आहेत. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत.