Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांकडून अजूनही व्याजवसुली

शेतकर्‍यांकडून अजूनही व्याजवसुली

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:14PMबीड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना सरकारने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. असे असले तरी शेतकर्‍यांकडून बँका व्याज करीत आहेत. यावर ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. यामुळे विनाकारण शेतकरी भरडला जात आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटाने शेतकरी खचून गेला आहे. यासह शेतीवर होणारा खर्चही वाढला आहे. त्या तुलनेत शेतकर्‍यांच्या पिकांना भाव मिळत नाही, अशा दुषचक्रामुळे शेतकरी संकटाच्या बाहेर निघत नाही. यासह खाजगी सावकार व बँकांकडील कर्ज फिटणेही शेतकर्‍यांना कठीण जाते. यातुनच शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे. 

बीड जिल्ह्यात दीड लाखपेक्षा अधिक शेतकरी या कर्जमाफीला पात्र झाले आहेत. आणखीही काही शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज भरावयाचे राहिले असल्यास त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. तर, दुसरीकडे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या आठ ते नऊ याद्या  बँकाना आल्या आहेत. यातून शेतकर्‍यांना 760 कोटी रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत मिळाली आहे. 

अनेक शेतकर्‍यांनी सहकारी व राष्ट्रीय बँकांकडून 40 ते 50 हजारांपर्यंत पीककर्ज घेतले आहे. अशा शेतकर्‍यांना सरकारने कर्जमाफी दिल्याचे जवळपास वर्ष होत आहे. या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाल्याची यादी आता बँकांकडे आली आहे. असे असले तरी 40 ते 50 हजारांचे झालेले चार ते पाच हजार रुपये व्याज बँका शेतकर्‍यांकडून वसूल करू लागल्या आहेत. काही शेतकर्‍यांकडे एख ते दीड लाख रुपये पीककर्ज होते. या शेतकर्‍यांना 15 ते 20 हजार रुपये व्याज नाहक भरावे लागत आहे. या शेतकर्‍यांना व्याजासह कर्जमाफी दिल्याचे प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून सांगण्यात येत असले तरी बँका मात्र शेतकर्‍यांकडून बिनदिक्कत व्याज वसूल करू लागल्या आहेत. यातून शेतकर्‍यांची लूट होत असून अशी व्याजवसुली थांबविण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

शेतकर्‍यांसमोर नाही पर्याय

जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी 40 ते 50 हजार रुपये पीककर्ज घेतले आहे. या शेतकर्‍यांचे पीककर्ज माफ झाले आहे. मात्र, त्याच्यावरील चार ते पाच हजार रुपये व्याज बँका वसूल करून घेत आहेत. शेतकर्‍यांना सध्या बियाणे, खते, मशागत यासाठी पीककर्ज हवे आहे. त्यामुळे शेतकरीही हतबल झाले असून त्यांच्यासमोर व्याज भरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.