Wed, Apr 24, 2019 20:11होमपेज › Marathwada › दिलीपराव देशमुखांचा निर्णय बदलू शकतो मतदारसंघ 

दिलीपराव देशमुखांचा निर्णय बदलू शकतो मतदारसंघ 

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 10:32PMपरभणी : दिलीप माने

राज्यातील 6 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाली असली तरी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारासंदर्भात अद्याप वाच्यता केली नाही.

प्रमुख पक्षातील नेत्यांच्या युती व आघाडीसंदर्भात अजून बैठका, चर्चा सुरू झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे उमेदवार कोण? असा सवाल या सहा मतदारसंघांत उभा राहिला आहे. त्यात लातूरचे विद्यमान विधान परिषद सदस्य माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी होणारी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबत अजून चर्चा झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीतील मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यायचा हे ठरविणे अद्याप बाकी असल्यामुळे उमेदवार कोण? असा सवाल मतदारांसमोर पडला आहे. परभणी-हिंगोली मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसकडे होता.

मात्र दिलीपराव देशमुखांमुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता. मात्र देशमुखांच्या न उभा राहण्यामुळे परत मतदारसंघ बदलण्याच्या हालचाली सुरू होत आहेत का ? आणि झाल्यास मतदारसंघ कसे बदलतील व कोणता मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेईल. त्याप्रमाणे उमेदवार ठरवल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तळातून बोलली जात आहे. यामुळे राज्यातील 6 निवडणुकांमधील उमेदवारांचे चित्रही बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून 21 मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही निवडणूक जाहीर झाली असली तरी कोणत्याच पक्षाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नाही.

मात्र विद्यमान आमदारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे गृहीत धरून मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. परभणी विधान परिषदेवर पुन्हा निवडून जाण्यासाठी विद्यमान आ. बाबाजानी दुर्राणी यांनीही परभणी व हिंगोलीतील मतदारांच्या भेटी घेण्यास प्रारंभ केला आहे. राष्ट्रवादीला जर ही जागा सोडली तर बाबाजानी दुर्राणी हेच उमेदवार असतील. मात्र माजी महापौर प्रताप देशमुख यांनीही आपल्याला उमेदवारी दिली तर चांगल्या प्रकारे काम करून दाखवू, असा दावा पक्षाकडे केला आहे. राष्ट्रवादीकडून 2 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडूनही प्रथमच उमेदवारी मागण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रफुल्ल पाटील, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरांच्या सुकन्या मेघना साकोरे-बोर्डीकर यांना पक्षाने उमेदवारी दिली तर तेही निवडणूक लढविण्यास इच्छुक दिसत आहेत.

काँग्रेसकडून मात्र सुरेशदादा देशमुख यांच्याशिवाय ही निवडणूक लढविण्यास कोणीही इच्छुक नाही. सुरेश देशमुख हे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे हा मतदारसंघ काँगे्रसला सुटल्यास देशमुखच प्रमुख दावेदार राहतील. या मतदारसंघात सर्वात जास्त संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून ही संख्या 162 इतकी आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसकडे 135, शिवसेना 97, भाजप 51, राष्ट्रीय समाज पक्ष 07, जनशक्‍ती विकास आघाडी 15, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 05, एम. आय. एम. 01, घनदाट मामा मित्रमंडळ 07, अपक्ष 22 असे संख्याबळ आहे. प्रमुख पक्ष सोडल्यानंतर अपक्षही मोठ्या प्रमाणात असून या निवडणुकीत 3 नगर पंचायतीच्या सदस्यांना मतदानाचा हक्क मिळाल्याने मतदारांची संख्या वाढली आहे.

Tags : Parbhani, State 6 seats, Legislative Council election, announced,