होमपेज › Marathwada › पीक विमा योजनेला सुरुवात

पीक विमा योजनेला सुरुवात

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:14AMगेवराई : प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळावे व अशा कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांची आर्थिक बाजू अबाधित राहावी व कृषी क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांनी पीक विमा भरून पिकांना संरक्षण मिळवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट चक्रीवादळ भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड कीड रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट तसेच हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान व काढणीनंतर नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अशी जोखमीच्या व्याप्ती वाढविण्यात आली आहे. विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेत सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी आपले फोटो असलेले खाते पुस्तकातील प्रत तसेच आधार कार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकर्‍यांनी आपली बँकेचे कर्ज खाते आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरित बँकेशी संपर्क साधावा असेही म्हटले आहे, 

पीक विमासाठी बीड जिल्ह्यातील 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारण, कापूस, कांदा या पिकांचा समावेश आहे.  शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.