Wed, May 22, 2019 11:03होमपेज › Marathwada › वादग्रस्त पोस्ट रोखण्यास पोलिसांकडून विशेष खबरदारी

वादग्रस्त पोस्ट रोखण्यास पोलिसांकडून विशेष खबरदारी

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMपरभणी : प्रतिनिधी

सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर समाजमाध्यमांचा चुकीचा वापर होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेत पोलिस प्रशासनाकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनची बैठक घेण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि तत्सम माध्यमातून अफवा, चुकीचे संदेश, लोकांच्या भावना दुखावणार्‍या पोस्टवर परभणी पोलिसांची नजर राहणार आहे. या संदर्भात जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना अधीक्षक कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत.

समाजमाध्यमातून अनेक वेळा धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार घडतात. एखाद्याची नाहक बदनामी होऊन समाजात तेढ निर्माण होते. यातून सामाजिक अशांतता निर्माण होत असल्याने परभणी पोलिसांकडून विशेष सावधगिरी बाळगल्या जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सतत अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या आणि निरनिराळे ग्रुप चालवणार्‍या अशा अ‍ॅडमिनच्या बैठक घेण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविताना विशेष काळजी कशी घ्यावी,  विवादित मजकूर टाकू नये, किंबहुना समाजमाध्यमाचा चुकीचा वापर करुन जाणीवपूर्वक आक्षेपार्ह विवादित मजकूर टाकणार्‍यांवर कोण-कोणत्या नियमान्वये कारवाई करण्यात येईल. या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  यामुळे समाजमाध्यमांचा बेसुमार वापर करणार्‍या तरुण पिढीला याचे फायदे आणि तोटे लक्षात येणार आहेत. त्याद्वारे समाजात पसरणारे चुकीचे मेसेज काही प्रमाणात कमी होतील, अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीला समाजात प्रसारमाध्यमांवरून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होणे सुरू झाले. 

एवढेच नाही तर वैयक्तिक द्वेषातून सूडबुध्दीने बदनामीकारक व विटंबनाजनक मजकूर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड करून वाद निर्माण केल्या जात आहे.  यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाने अ‍ॅडमिनची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही प्रकारचा विवादित मजकूर अपलोड केल्यास कारवाई

समाजमाध्यमांवर वैयक्तिक, धर्मविषयक, महापुरुषांचे पुतळे, तैलचित्रे, सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्यास त्या ग्रुपची कसून चौकशी करून अ‍ॅडमिनवरही कारवाई करण्यात येणार आहे. ग्रुप निर्मात्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे समाजमाध्यमांचा वापर करताना नागरिकांनी  कोणत्याही प्रकारचा विवादित मजकूर व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड करू नये. 
-संजय परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी, परभणी शहर