Wed, Nov 21, 2018 08:06होमपेज › Marathwada › लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राज्यात तिसरा

तीन नोकऱ्या सोडून उपजिल्हाधिकारी झालेल्या सोपान टोणपे यांचा जिल्हाधिकारी होण्याचा मानस

Published On: May 31 2018 7:25PM | Last Updated: May 31 2018 7:25PMहिंगोली : प्रतिनिधी

एमपीएससी म्हटल की डोळ्यासमोर एकच ध्येय असते ते म्हणजे प्रशासकीय अधिकारी होणे. पण हे ध्येय पार करायचे म्हणजे तितके सोपे नाही. एमपीएससीतून पोस्ट काढणे म्हणजे अतीतडीचा सामनाच असतो. मात्र यासर्व घटनेला हिंगोलीतील औंढा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील सोपान टोणपे यांने छेद दिला आहे. यंदाच्या परिक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविलेल्या सोपानवर शुभेच्छाचा वर्षांव होत आहे. मात्र  चक्क तीन नोकऱ्या सोडून उपजिल्हाधिकारी बनलेल्या सोपानचा जिल्हाधिकारी होण्याचा मानस आहे.

तलाठी ते उपजिल्हाधिकारी असा प्रवास करत औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सोपान टोन्पे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ३७७ पदांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. तीन सरकारी नोकऱ्या सोडून त्यांनी हे मिळविलेले यश जिल्हाभरात कौतूकाचा विषय ठरला आहे.

सुरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोपान टोणपे यांनी येहळेगाव सोळंके येथे माध्यमिक शिक्षण घेतले. औंढा येथील नागनाथ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर २०११ साली ज्ञानवर्धिनी महाविद्यालयात डीएड्चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांची डिसेंबर २०१३ मध्ये तलाठी म्हणून हिंगोली महसूल विभागात तलाठी म्हणून नियुक्ती झाली. शेतकऱ्याशी निगडीत महसूल प्रशासनात काम करीत असताना शेतकऱ्याच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. 

तलाठी पदावर राहून शेतकऱ्यांना न्याय देवू शकत नाही ही त्यांनी मनी बांधलेली खूणगाठ पुढे त्यांना अधिकारी होण्यासाठी प्रेरणा देत होती. तलाठी पदावर कार्यरत असताना कामाबरोबरच नित्यनियमाने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणे ही त्यांची दिनचर्या होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांची लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दिलेल्या स्पर्धा परिक्षेतून मार्च २०१६ मध्ये त्यांची बेलापूर येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली. प्रशासनातील चांगले पद मिळूनही त्यांनी अभ्यासाची जिद्द सोडली नाही. पुन्हा एकदा नव्या दमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१७ मध्ये झालेल्या आयोगाच्या पूर्व मुख्य परिक्षेत त्यांनी यश मिळविले. मुलाखतीनंतर ३० मे रोजी अंतीम निकाल जाहीर झाला. यामध्ये ३७७ पदासाठी जाहीर झालेल्या या निकालातून सोपान टोम्पे यांनी राज्यातून तिसरा क्रमांक मिळविला आहे.