Mon, Jun 17, 2019 02:21होमपेज › Marathwada › जप्त केलेली सोळाशे ब्रास वाळू झाली गायब 

जप्त केलेली सोळाशे ब्रास वाळू झाली गायब 

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 15 2018 11:59PMमाजलगाव ः सुभाष नाकलगावकर 

तालुक्यातील गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करण्यात येत असून यामुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच महसूलही मिळत नाही. या विरोधात महसूल व पोलिस प्रशासन कारवाई करत असते, परंतु कारवाईनंतर जप्त केलेली वाळूही गायब होण्याचे प्रकार होत असल्याने प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जवळपास सोळाशे ब्रास वाळू गायब झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणात महसूल प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही.

माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रात अधिकृतपणे एकही वाळू ठेका दिला गेलेला नाही. तरीही अवैध वाळू उपसा सुरूच असतो. या विरोधात पोलिस आणि महसूल विभागची पथके कारवाई करतात. तसेच वाळू साठ्यांवरही धाड मारून साठा जप्त केला जातो, परंतु जप्त केलेली वाळूच गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. महसूल विभागाने जवळपास आठ ठिकाणी धाड मारुन जप्त केलेली 1680 ब्रास वाळू चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसीलदार एन. जी. झंपलवाड यांनी दि. 6 एप्रिल 2017 ला आठ ठिकाणची मिळून तब्बल 1680 ब्रास वाळू जप्त केली होती. त्या-त्या ठिकाणच्या कोतवालाकडे याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिस यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. तरीही ही वाळू चोरी गेली आहे. 

गावनिहाय जप्त केलेली वाळू

धनगरवाडी (1) ः 140 ब्रास, सावरगाव ः 310 ब्रास, धनगरवाडी (2)ः 255 ब्रास, एमआमडिसी ः 695 ब्रास, फुलेपिंपळगाव ः 140 ब्रास, हरकी लिंबगाव (1)ः 320 ब्रास, हरकी लिंबगाव (2) ः 20 ब्रास, हरकी लिंबगाव (3)ः 35 ब्रास, सावरगाव ः 30 ब्रास. 

या वाळूची लिलावाद्वारे विक्री होणार होती, मात्र जास्त रक्कमेमुळे लिलावात कोणीच भाग घेतला नाही. यानंतर ही वाळू चोरी गेली. यातील केवळ एमआयडीसीमधून चोरी गेलेल्या वाळू प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.

सदरील वाळू चोरीबाबत चौकशी करून अहवाल उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठवला आहे. त्यांनी सूचना दिल्यानंतर पुढील कार्यवाही करणार आहोत. - एन. जी. झंपलवाड, तहसीलदार माजलगाव. 

सदरील वाळू चोरी बाबत केवळ एका ठिकाणचा अहवाल आला आहे. त्यावर कारवाई करणे चालू आहे, मात्र इतर 7 ठिकाणची वाळू चोरी झाल्याप्रकरणी मला   माहिती नाही. त्याची माहिती घेतल्या नंतर पुढील कारवाई करण्यात येईल. - प्रियंका पवार, उपविभागीय अधिकारी माजलगाव.