Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Marathwada › शिवशाही बस उलटली; एक ठार, सहा जखमी

शिवशाही बस उलटली; एक ठार, सहा जखमी

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 02 2018 11:00PMकेज : प्रतिनिधी

लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस होळ जवळ उलटून झालेल्या अपघातात बसमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. बसखाली अडकलेल्या शिक्षिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नऊ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये सोळा प्रवासी होते. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

राष्ट्रीय महामार्गाचे लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा पर्यंत ठिकठिकाणी महामार्गाचे काम करण्यात येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे खोदकाम, मजबुतीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. होळ ते चंदनसावरगाव दरम्यान रस्ता कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे, मात्र येथे वाहनांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले  नाहीत. मंगळवारी  पहाटे लातूर आगाराची शिवाशाही बस (एमएच 09 ईएम 2468) औरंगाबादकडे जात होती.  बस  होळच्या पुढे आल्यानंतर समोरून आलेल्या वाहनास बाजू देताना खोदकामात बसचे चाक गेले. काही कळण्यापूर्वीच बस उलटली व बसमधील काही प्रवाशी खिडकीतून बाहेर फेकले गेले. काही प्रवासी बसमध्येच अडकून राहिले. खिडकीतून बाहेर फेकलेल्या ढाकेफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका रेणुका कल्याण माळी (वय 30, रा. चिंचोली माळी, ता. केज) व लातूर येथील अमर जियाउद्दीन सिद्दीकी (वय 9)  हे  बसच्या खाली फसले.

कंबरेवर बस आदळल्याने रेणुका माळी यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी साडेअकराच्या सुमारास त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. जखमी अमर जियाउद्दीन सिद्दिकी यास उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे. बसचालक भागवत दादाराव केंद्रे, पांडुरंग भीमराव म्हेत्रे, राजू सानुजी इवले, सतीश गणपत गव्हाणे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर  अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राकेश जाधव, डॉ. कचरे यांनी जखणींवर उपचार केले.