होमपेज › Marathwada › जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:43PMबीड : प्रतिनिधी 

जम्मू-काश्मिरमधील कठुआ, उन्नाव व सुरतमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांचा निर्घृणपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सर्व धर्मिय आणि सर्व पक्षीयांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. जस्टीस फॉर आसिफा, जस्टीस फॉर उन्नाव अशा घोषवाक्यांचे फलक हाती घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्व धर्मियांनी राक्षसीवृत्तीचा तीव्र निषेध निःशब्द होऊन व्यक्त केला.  

अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी किल्लामैदान परिसरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने सर्वधर्मीय सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन मूकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जस जसा पुढे पुढे जात होता तस तशी त्यात सहभागी होणार्‍यांची संख्या वाढत होती. हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा  मोर्चेर्‍यांनी निषेधाचे फलक हाती घेतले होते. किल्ला मैदान, बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेस, बशिरगंज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगररोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेल्या मूकमोर्चातून जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील आसिफावर झालेल्या अत्याचाराचा, उन्नाव आणि सुरत येथील घटनांचा निषेध करण्यात आला.  

संयमाचा बांध तुटला अन्....

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झालेल्या मूकमोर्चा अचानक बोलका झाला. हातात निषेधाचे फलक घेऊन तळपत्या उन्हात उभ्या असलेल्या तरुणांच्या संयमाचा बांध तुटला आणि मूठ आवळत वर हात करून फाशी...फाशी..., आसिफाको न्याय दो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या घोषणांमधून मूकमोर्चातील संताप व्यक्त होत होता.

पाटोद्यात सर्वधर्मीय मूकमोर्चा 

पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून काढण्यात आलेल्या मोर्चात शहरात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता. कठुआ घटनेच्या निषेधार्थ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती.

Tags : Marathwada, Silent, march, Collectors, office