Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Marathwada › 'शिवशाही'चा टायर फुटला; ४० प्रवाशी बचावले !

शिवशाहीच्या प्रवाशांची रात्र रस्त्यावरच...

Published On: May 06 2018 3:15PM | Last Updated: May 06 2018 3:15PMबीड  : प्रतिनिधी 

मागील आठवड्यातच केज तालुक्यातील होळ जवळ शिवशाही बसला अपघात होऊन एका शिक्षिकेचा जीव गेला होता. या घटनेमुळे शिवशाही बसच्या सुरक्षेबद्दल निर्माण झालेली शंका धूसर व्हायच्या आधीच शनिवारी मध्यरात्री आणखी एक घटना घडली. पुन्हा एका भरधाव वेगातील शिवशाही बसचा टायर फुटल्याची घटना समोर आली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवर कसेबसे नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंबाजोगाई आगाराची शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ०९०५) शनिवारी रात्री पुण्याकडे निघाली होती. बार्शीजवळ बसचा टायर अचानक फुटला. हि बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य अनर्थ टळला. यावेळी गाडीत लहान मुले, महिलांसह ४० प्रवाशी होते. 

अपघातानंतर रात्रभर प्रवाशांचा रस्त्यावरच मुक्काम

अपघातानंतर चालकाने बार्शी आगारात संपर्क साधून मदत पाठविण्याची विनंती केली. परंतु, बार्शी आगाराकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २५ प्रवाशांनी रात्र रस्त्यावर काढली. तर उर्वरित प्रवाशी मिळेल त्या वाहनाने निघून गेले. अनेक विनंत्या केल्यानंतर बार्शी आगारातून सकाळच्या मेकॅनिक आला, परंतु त्यालाही टायर काढता आले नाही. यासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगूनही बार्शी आगाराकडून वेळेवर मदत मिळाली नाही. मागील आठवड्यात याच बसचे टायर अचानक पेटले होते अशी माहितीही आता समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे शिवशाही बसच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

’शिवशाही’ नियोजनाचा सावळा गोंधळ

मोठ्या थाटात सुरु झालेल्या शिवशाही बससेवेच्या नियोजनाचा सावळा गोंधळ समोर येत आहे. शिवशाहीच्या सर्व बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालक ठेकेदाराचा तर वाहक महामंडळाचा अशी जोडी लावण्यात आली आहे. जेव्हा काही अडचण निर्माण होते तेव्हा आगारातील कर्मचारी खाजगी चालकांना मदतीसाठी टाळाटाळ करतात. त्याचा नाहक त्रास  प्रवाशांना सहन करावा लागतो. प्रवाशांकडूनही या बसची विशेष काळजी घेतली जात नसल्याचेही चित्र आहे. अनेक गाड्यामध्ये प्रवाशांनी थुंकून घाण केली आहे. तसेच बसमधील काही ठिकाणी साहित्याची मोडतोड केली आहे.