Sat, Jun 06, 2020 19:57होमपेज › Marathwada › राजेवाडीच्या बंधार्‍यावर शिवसेनेचे आंदोलन

राजेवाडीच्या बंधार्‍यावर शिवसेनेचे आंदोलन

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:22AMमाजलगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील राजेवाडी बंधार्‍याचे उच्चपातळी बंधार्‍यात रुपांतर करावे या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने बंधार्‍यावरील पुलावर कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. या मागणीची पूर्तता न झाल्यास आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा डॉ. उध्दव नाईकनवरे यांनी दिला.

तालुक्यातील राजेवाडी येथील बंधारा कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेला आहे. या बंधार्‍यातून राजेवाडी, केंडेपिंप्री, नित्रूड, पुनंदगाव, धानोरा या गावांना पाणीपुरवठा होतो. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून या बंधार्‍याचे काम अपूर्ण आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. सदर बंधार्‍यास पाणी अडविण्यास दरवाजे नाहीत, त्यामुळे बंधार्‍यात पाणीसाठा होत नसल्यामुळे राजेवाडी, केंडेपिंप्री, नित्रूड, पुनंदगाव धानोरा शिवारातील हजारो एकर जमिनी ओलीताखाली येत नाहीत.

त्यामुळे शेतकर्‍यांचे पिकासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. राजेवाडी येथील बंधार्‍यास तत्काळ दरवाजे बसवावेत, राजेवाडी बंधार्‍याचे उच्चपातळी बंधार्‍यात रुपांतर करावे अशी मागणी शिवसेनेने केली. डॉ. उध्दव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली सोेमवारी राजेवाडी  बंधार्‍याच्या भिंतीवर उभारून आंदोलन केले. दरम्यान मागण्यांची पूर्तता न झाल्यास आ. आर. टी. देशमुख यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा डॉ. नाईकनवरे यांनी दिला आहे. या आंदोलनास मानवी हक्क अभियानने पाठींबा दिला होता. 

आंदोलनात मनोहर डाके, पापा सोळंके, अतुल उगले, शिवसेनेचे युवा नेते व ग्रा. प. सदस्य महेश थेटे, पांडुरंग गोजे, नामदेव सोजे, सरपंच साहेबराव आवाड, उपसरपंच रामेश्वर थेटे, अंगद मायकर, परमेश्वर थेटे, सुशिल धपाटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी चव्हाण आंदोलनस्थळी आले होते. माजलगाव, वडवणी, दिंद्रूड या तिन्ही पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकार्‍यांनी बंदोबस्त ठेवला होता.